गिरीश महाजन यांचा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० हून अधिक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून काही नेत्यांच्या प्रवेशासंदर्भात आठवडाभरात निर्णय होणे अपेक्षित असल्याचे गिरीश महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. भाजपप्रवेशासाठी आम्हाला कोणावरही दबाव आणण्याची गरज नसून भाजपमध्ये येण्यासाठी हे नेतेच आमच्या मागे लागले आहेत. त्यापैकी निवडक व चांगल्या नेत्यांना भाजपला आवश्यक वाटल्यास प्रवेश दिला जाईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

भाजप अन्य पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणून व चौकशा मागे लावून भाजपप्रवेशासाठी भाग पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. या पाश्र्वभूमीवर महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उभय पक्षातील नेत्यांची रांग लागली असून आम्हाला कोणावरही दबाव आणण्याची गरज नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, भाजपवर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात वाताहत झाली असून या पक्षांमध्ये राहण्याची त्यातील नेत्यांची तयारी नाही. काँग्रेसकडे नेतृत्व राहिलेले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे असा दावा महाजन यांनी केला.

अनेक नेते मला भेटून गेले आहेत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले आहेत. ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप नाहीत, गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही आणि विधानसभा निवडणुकीतजिंकून येऊ शकेल, अशा चांगल्या नेत्यांचाच भाजप प्रवेशासाठी विचार केला जात असल्याची माहिती महाजन यांनी दिली. विधानसभा निवडणुकीआधी ज्या मतदारसंघात भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्याची गरज आहे, अशा नेत्यांनाच भाजपमध्ये स्थान मिळणार आहे. शिवसेनेशी युती असल्याने भाजपच्या वाटय़ाला १३५ ते १४० जागा येतील. त्यापैकी १२२ विद्यमान आमदार असून काहींना बदलले, तरी भाजपमधील नेत्यांचा विचार करता अन्य पक्षांमधून नेते आणून त्यांना उमेदवारी देणे शक्य होणार नाही. त्यामुळे ज्या जागा शिवसेनेकडे आहेत, तेथे अन्य पक्षातील निवडक नेत्यांना शिवसेनेकडे पाठविले जात आहे, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले. मुख्यमंत्री किंवा अन्य जेष्ठ नेत्यांना भेटले, म्हणजे लगेच प्रवेश दिला जाईल, असे नाही. मात्र आठ-दहा दिवसांत काही नेत्यांबाबत निर्णय होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.