जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते उद्घाटन

मुंबई : महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या विविध सामाजिक-राजकीय-आर्थिक प्रश्नांवर सखोल चिंतन करून त्या प्रश्नांवरील उपायांचा शोध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाचा आरंभ आज, गुरुवारी होईल. राज्यातील पाणीप्रश्नावर यानिमित्ताने दोन दिवसांचा जागर होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या चर्चासत्राचे उद्घाटन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणाने होईल तर शुक्रवारी सायंकाळी ज्येष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांच्या भाषणाने चर्चासत्राचा समारोप होईल.

नागरीकरण, शिक्षण, उद्योजकता, आरोग्य, वाहतूक अशा विविध विषयांवर आतापर्यंत लोकसत्ताच्या ‘बदलता महाराष्ट्र’मध्ये विचारमंथन झाले आहे. आता ‘आव्हान पाणीप्रश्नाचे’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.  पाण्याशी निगडित विविध क्षेत्रात काम करणारी राज्यातील तज्ज्ञ मंडळी आपले विचार या चर्चासत्रामध्ये मांडणार आहेत.

आज गुरुवारी ‘आटते भूजल, जमिनीची चाळणी’ या सत्रात भूजल संचलनालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. चंद्रकांत भोयर, जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे सचिव सुरेश कुलकर्णी आणि डॉ. सुहास आजगांवकर या विषयाचा वेध घेत उपाययोजना सुचवतील. दुसरे सत्र ‘पाणी अडवा ते जलयुक्त शिवार’ या विषयावर होणार असून जलसंधारण विभागाचे माजी सचिव प्रभाकर देशमुख, जलतज्ज्ञ सुधीर भोंगळे आणि जलसंपदा विभागाचे माजी सचिव श्रीकांत हुद्दार आपली मते मांडतील. तर तिसऱ्या सत्रात ‘नदीचे वर्तमान आणि भविष्य’ यांचा सखोल विचार करण्यात येईल. त्यात दि. मा. मोरे, सुनील जोशी, विजय परांजपे ही तज्ज्ञ मंडळी सहभागी होतील. पहिल्या दिवसाच्या चर्चासत्राचा समारोप प्रसिद्ध अभिनेते व जलसंवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

शुक्रवारी ‘शहर व पाणी’ या सत्रात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता व नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोहन डगावकर सहभागी होतील. त्यानंतर भूजलाचे जलसुरक्षेतील महत्त्व यावर जलतज्ज्ञ हिमांशु कुलकर्णी विचार मांडतील. ‘पाण्याचा सीमावाद’ या विषयावरील सत्रात माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे आणि पाटबंधारे विभागातील निवृत्त अधिकारी उत्तमराव निर्मळ राज्यात सध्या पाण्यावरून सुरू झालेल्या प्रादेशिक वादाचा वेध घेत हा संघर्ष कसा टाळता येईल यावर भाष्य करतील. ‘पाणी आणि लोक चळवळ’ या सत्रात नामदेव ननावरे आणि कौस्तुभ आमटे जलसंवर्धनाच्या कामाला लोक चळवळीत कसे रूपांतरित करता येते याचा ऊहापोह करतील.