अश्लील छायाचित्रांच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल
सोशल नेटवर्किंग साइटमध्ये लोकप्रिय असलेल्या फेसबुकचा वापर मित्र जोडण्यात होत असला तरी अनोळखी मित्र घातक ठरत असतात हे वारंवार सिद्ध होत आहे. कांदिवलीत राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला अशाच एका अनोळखी मुलाशी मैत्री करणं महागात पडलं. त्याने या मुलीची अश्लील छायाचित्रे बनवून तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. गुन्हे शाखा ११ च्या पथकाने या तरुणाला रायगड येथून अटक केली आणि या मुलीची मानसिक त्रासातून सुटका झाली.
प्रिया (नाव बदललेले) ही १७ वर्षांची मुलगी कांदिवलीत राहते. फेसबुकवर तिला प्रथमेश साळुंखे (२०)या तरुणाची फेसबुकमध्ये फेंडशीप रिक्वेस्ट आली. त्या दोघांचे काही सामायिक मित्र (म्युच्युअल फ्रेंडस) होते. त्यामुळे प्रियाने ती रिकवेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांचे फेसबुकवर चॅटिंग सुरू झाले. प्रथमेशने प्रियाबाबतची सर्व माहिती जाणून घेतली होती. त्याने प्रियाचे खाजगी फोटो मागवले. त्यानंतर फोटोशॉपच्या आधारे तिचे अश्लील फोटो बनवले. या छायाचित्रांच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. जर सात हजार रुपये दिले नाहीस तर ही छायाचित्रे इंटरनेटवर टाकेन अशी त्याने धमकी दिली. घाबरलेल्या प्रियाने आपल्या घरी हा प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी चारकोप पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.
गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन विचारे आणि त्यांच्या पथकाने या तरुणाचा शोध सुरू केला. त्याचे फेसबुक प्रोफाईल बनावट होते. मग पोलिसांनी तांत्रिक बाजूने तपास सुरू करून त्याचा आयपी अ‍ॅड्रेस काढून फोन नंबर मिळवला. तो रायगडच्या खोपोली येथील राहणारा असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी चिकणे यांनी खोपोली परिसरात शोध सुरू केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तेथून त्यांनी प्रथमेशला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला चारकोप पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. गुन्हे शाखा ११ च्या पथकातील सुधीर कोरगावकर, राजू गारे, राजेश चव्हाण, अशोक कोंडे, राजू सावंत, राकेश लोटणकर यांनी खोपोली येथून आरोपीला शोधण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
त्याने केवळ प्रियाचा विश्वास संपादन करून तिचे खाजगी फोटो मिळवले होते आणि नंतर त्याचा गैरवापर केला असता. हे फोटो इंटरनेटवर अपलोड झाले असते तर प्रियाची बदनामी झाली असती असे सहा. पोलीस निरीक्षक नितीन विचारे यांनी सांगितले. अनेकदा सामायिक मित्र दिसल्याने अनोळखी लोकांची रिक्वेस्ट स्वीकारली जाते. पण तसे करण्यातही धोका असल्याचे सायबरतज्ज्ञ सांगतात. फेसबुकद्वारे मैत्री करून नंतर बलात्कार करणे, आर्थिक फसवणूक करणे आदी गुन्हे देशभरात घडत असतात. यासाठी काही खबरदारीचे उपाय सायबरतज्ज्ञांनी सांगितले आहेत.

काय काळजी घ्यावी
’ अनोळखी फ्रेंडशीप रिक्वेस्ट खात्री झाल्याशिवाय स्वीकारू नये.
’ एखाद्याच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये त्याचे फोटो नसतील किंवा फार काही पोस्ट नसतील तर सावध रहावे. असे प्रोफाईल बनावट असण्याची शक्यता आहे.
’ राजकारणी किंवा प्रसिद्ध व्यक्ती सगळ्यांच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये असतात. बनवाट प्रोफाईल बनवणारे त्यांना आपल्या फेसबुकमध्ये जोडतात. त्यामुळे आपल्याला असे बनावट प्रोफाईल पाहिल्यावर सामायिक मित्र असल्याचं वाटतं.
’ कुणालाही आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
’ प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन आपल्या वैयक्तिक पोस्ट, माहिती आणि फोटो लॉक करावे.
’ फेसबुक मित्राला भेटायला जाताना एकटय़ाने जाऊ नये.
’ दूर शहरातील मित्र असतील तर त्याच्या जवळ जाण्याचा मोह टाळावा.