News Flash

Loksatta Online Impact : तपोवन एक्स्प्रेसमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या अशोक प्रधानला अटक

लोहमार्ग पोलिसावरही कारवाई करण्यात येईल

२९ जूनला पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार घडला.

‘तपोवन एक्स्प्रेस’मध्ये तरूणीला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या तरुणाला मुंबई लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या विकृत तरुणाचा शोध घेतला आहे. अशोक प्रधान (२० वर्ष) असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा भुवनेश्वरचा आहे. मुंबईत तो बिगारी काम करतो. अश्लिल चाळे करणाऱ्या तरुणाची बातमी सर्वप्रथम ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने उजेडात आणली होती.

२२ वर्षाची तरुणी कामानिमित्त नाशिकला निघाली होती. २९ जूनला पहाटे साडेपाच वाजता पहाटे सीएसटी स्थानकात आल्यावर ती प्लॅटफॉर्म क्रमांक १३ वर उभ्या असलेल्या ‘तपोवन एक्स्प्रेस’ने नाशिकला जाण्यासाठी निघाली. सीएसटीवरून ही ट्रेन सकाळी सव्वा सहाला निघते. ती वेळेच्या आधीच तिथे पोहोचली होती. अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे बघून ट्रेनमध्ये थांबलेला एक विकृत तरुण त्या तरुणीकडे बघून हस्तमैथून करु लागला.  या प्रकारामुळे घाबरल्याने ती दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्यासमोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लिल चाळे करू लागला. तिने पुरावा म्हणून त्या विकृताचा व्हिडिओही काढला. याची माहितीही तिने पोलिसांना दिली. पण पोलिसांनी अपेक्षित सहकार्य तिला केलं नाही याउलट तुम्ही दुसरीकडे जा, असा सल्ला या पोलिसाने तिला दिला आणि तिथून काढता पाय घेतला. ‘लोकसत्ता ऑनलाईन’वर बातमी प्रकाशित होताच बुधवारी तपासाची सूत्रे वेगाने फिरली. संबंधीत तरुणीने पोलिसांकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही तातडीने तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी कर्नाक बंदर परिसरात बिगारी काम करणाऱ्या अशोक प्रधानला अटक केली. अशोक प्रधान हा भुवनेश्वरचा असून सध्या तो मुंबईत बिगारी काम करतो अशी माहिती एसीपी मच्छिंद्र चव्हाण यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दरम्यान, संबंधीत तरुणीच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस हवालदाराची विभागीय चौकशी केली जाणार आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची शिफारस केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.  ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत त्याचा पाठपुरावा केला होता.

विश्वास पुरोहित
vishwas.purohit@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 7:14 pm

Web Title: girl caught a guy masturbated in tapovan express police detained suspected person
Next Stories
1 डेबिट कार्डच्या क्लोनिंगद्वारे मुंबईतील वकिलाचे ६२ हजार लुटले
2 मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू
3 Exclusive Video : धक्कादायक! CST स्थानकात एक्स्प्रेसमध्येच तरुणीसमोर तरूणाचे अश्लिल चाळे
Just Now!
X