कल्याण शीळफाटा रस्त्यावरील सूचक नाका (टाटा पॉवरजवळ) येथे मंगळवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पल्लवी निकम या तीन वर्षांच्या एका मुलीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अर्धा तास रास्ता रोको केला.
पल्लवी आपल्या आईसोबत शीळफाटा मुख्य रस्त्याने जात असता तेथून भरधाव वेगाने जाणाऱ्या विठ्ठलवाडी आगाराच्या बसने (क्र. एमएच-२०-डी-९२७८) पल्लवीला जोराची धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. काही क्षण पल्लवीच्या आईला काय घडले, हे कळले नाही.
हे वृत्त सर्वत्र पसरताच सूचक नाका परिसरातील नागरिक जमा झाले व त्यांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. जमाव संतप्त झाल्याने या मार्गावरून येजा करणाऱ्या वाहनांची नासधूस होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढविला. बसचालक पुरुषोत्तम खेडेकर याच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.