25 October 2020

News Flash

गॅस गीझरमुळे गुदमरून मुलीचा मृत्यू

गॅस गीझरमधून पाणी गरम होताना बाथरूममध्ये हवा खेळती नसल्याने कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू तयार होतो.

मुंबई : आंघोळ करताना बाथरूममधील गॅस गीझरमधून वायुगळती झाल्याने एका १५ वर्षीय मुलीचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गोराई येथे घडली. ध्रुवी गोहिल असे मुलीचे नाव आहे. कॉर्बन मोनॉक्साइडच्या संपर्कात आल्यामुळे ध्रुवीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ध्रुवी ही कुटुंबासह गोराई येथे राहत होती. ती नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गॅस गीझरमधून पाणी गरम करत होती. आईला आंघोळीला जाते, असे सांगून ती बाथरूममध्ये गेली. मात्र आंघोळीला जाऊन एक तास उलटला तरी ती बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला.

आतमधून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. या वेळी ध्रुवी बेशुद्धावस्थेत पडली होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. प्रकृती बिकट असल्याने तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती ध्रुवीच्या कुटुंबीयांनी दिली.

गॅस गीझरमधून पाणी गरम होताना बाथरूममध्ये हवा खेळती नसल्याने कार्बन मोनॉक्साइड हा विषारी वायू तयार होतो. या प्रकरणातही हेच झाले. परिणामी या वायूच्या संपर्कात आल्यामुळे ध्रुवी बेशुद्ध पडली. तसेच बेशुद्धावस्थेत तिचा पाय गरम पाण्याच्या नळाखाली आला होता. त्यामुळे तिचा पायही भाजला होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. तसेच ‘स्नागृहामध्ये गॅस गीझर लावू नका,’ असे आवाहन ध्रुवीच्या कुटुंबीयांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 2:04 am

Web Title: girl dies due to gas geyser akp 94
Next Stories
1 टॅक्सींवरील इंडिकेटरला संघटनांचा विरोध
2 मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वेळापत्रकावर परिणाम
3 जैवविविधता नोंदवह्य़ा तयार करण्याचे काम हे केवळ नाटक
Just Now!
X