वाढदिवस साजरा करण्यासाठी वाडा येथे गेलेल्या मुंबईच्या २१ वर्षीय तरुणीचा पुराच्या पाण्यात बुडून अंत ओढवला आहे. पिंकल शहा असे त्या तरूणीचे नाव असून ती बोरिवली येथे राहात होती. गेल्या आठवड्यापासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, कल्याण आणि परिसरात पुराग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. वाडा येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या २१ वर्षीय तरूणीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

वाडा तालुक्यातील कोहोज किल्ला परिसरात आपल्या मित्रमैत्रिणींसह २१ वर्षीय पिंकल वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. पिंकल हिचा २९ जुलै रोजी वाढदिवस होता. वीरेंद्र घोरपडे, आकाश चर, ॲलन ॲल्विन व श्लोका पाताडे या मित्रमैत्रिणींसमवेत कोहोज किल्ल्यावर सोमवारी फिरायला आले होते. मित्रमैत्रिणींसमवेत संध्याकाळी ती किल्ल्यावरून परतत होती. त्यावेळी हे सर्व एकमेकांचे हात धरून बंधारा ओलांडत असताना पाय घसरून पाण्यात पडले.

यावेळी पिंकल पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर उर्वरित चौघे झाडाच्या फांद्यांचा आधार घेत कसेबसे बचावले. घटनास्थळापासून काही अंतरावर पिंकलचा मृतदेह आढळून आला. तिला वाढदिवशीच मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेसंदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एच. बी. धनगर हे करत आहेत.