News Flash

दुर्दैव! कॅन्सरशी लढणाऱ्या चार वर्षाच्या मुलीचा लोकलमधून पडून मृत्यू

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलीचा मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला.

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलीचा मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. मागच्या आठवडयात चेंबूर स्टेशनवर मन सुन्न करुन टाकणारी ही घटना घडली. नेहा ठगे असे मृत मुलीचे नाव आहे. मूळची विदर्भाची असणारी नेहा कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईत आली होती. परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये येत असताना नेहा लोकलमधून पडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नेहाला घेऊन तिची आई प्रवाशांनी खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना गर्दीच्या रेटयामुळे दोघीही प्लॅटफॉर्मवर पडल्या. आधीच दोन ट्रेन सोडल्यामुळे त्यांना उशीर झाला होता. त्यामुळे गर्दी असूनही नेहाची आई तिला घेऊन त्या ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. प्लॅटफॉर्मवर पडल्यानंतर नेहाच्या तोंडातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. तिच्या हातांना आणि पायालाही मार लागला. तिच्या आईच्या डोळयांना मार लागला होता.

रेल्वे पोलीस लगेच दोघींना राजावाडी रुग्णालयात घेऊन गेले. नेहाची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला केईएम रुग्णालयात हलवले. आयसीयू कक्षामध्ये असताना ९ सप्टेंबरला नेहाची प्राणज्योत मालवली. ठगे कुटुंब पाच महिन्यांपासून नेहाच्या उपचारासाठी मुंबईमध्ये होते. केमोथेरपी आणि अन्य उपचारांना नेहा प्रतिसाद सुद्धा देत होती. तिने खेळायला, खायला, चालाय-फिरायला सुरुवात केली होती. यागोष्टी आधी तिला अजिबात जमत नव्हत्या असे तिचे वडिल शिवनंदन यांनी सांगितले.

विर्दभाच्या वाशिम जिल्ह्यामध्ये ठगे कुटुंब राहते. नेहाला दोन भांवडे आहेत. तिचे वडिल रोजंदारीवर काम करतात. यावर्षाच्या सुरुवातीला नेहाच्या पायात आणि पोटामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. स्थानिक डॉक्टरांना त्याचे निदान करता आले नाही. तिला परेलच्या केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे तिच्या शरीरात टयुमर असल्याचे निदान झाले. १४ एप्रिल रोजी टाटा मेमोरियल रुग्णालयात तिची नोंदणी झाली. टाटा हॉस्पिटल कॅन्सरवर उपचारासाठी प्रसिद्ध आहे.

टयुमरच्या स्वरुपातील कॅन्सर तिच्या शरीराच्या अन्य भागांमध्ये पसरला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला कॅमोथेरपी देण्यात आली. जी तिने चांगल्या प्रकारे सहन केली असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला नेहाचे कुटुंब रस्त्यावर रहात होते. नंतर एका एनजीओने त्यांची चेंबूर येथे व्यवस्था केली. आम्ही चेंबूरवरुन मोनोरेलने परेलला यायचो. १२ तासाच्या गॅपने नेहाला दोन इंजेक्शन घ्यावे लागायचे.

आम्ही दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबून असायचो. रात्री उशिरा घरी जायचो असे शिवनंदन यांनी सांगितले. मोनोरेलचे तिकीट परवडत नसल्यामुळे नेहाच्या आई-वडिलांनी आणखी स्वस्त पर्यायाचा शोध सुरु केला. ते लोकल ट्रेनने प्रवास करायचे. चेंबूरवरुन शिवडीला उतरुन तिथून टॅक्सीने ते टाटा हॉस्पिटलमध्ये यायचे. दहा दिवस मी दोघींसोबत राहिलो व त्यांना कुठली ट्रेन पकडायची कसे यायचे ते सर्व समजावून सांगितले. सात सप्टेंबरला पैशांची व्यवस्था करण्यासाठी मी वाशिमला परतलो. नेहाबरोबर मी तेव्हाच शेवटचे बोललो हे सांगताना शिवनंदन प्रचंड भावूक झाले होते. कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी आम्ही राहण्याची व्यवस्था करतो. पण रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. सर्वांना सामावून घेणे शक्य नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 3:50 pm

Web Title: girl fighting with cancer falls from train dies dmp 82
Next Stories
1 मुंबईसह सात रेल्वे स्थानके आणि मंदिरांमध्ये स्फोट घडवण्याची ‘जैश’ची धमकी
2 शिस्तीचे वळण राजांना लागत आहे; शिवसेनेचा उदयनराजेंना चिमटा
3 महाराज स्वार्थासाठी दिल्लीश्वरांच्या अधीन झाले नाही; शरद पवारांनी उदयनराजेंना दाखवला आरसा