धारावीत एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या दोन अज्ञात तरुणांसह तिघांवर सामूहिक बलात्कार आणि बाललैंगिक शोषण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी १६ वर्षांची असून नागपाडय़ात पदपथावर राहते. या मुलीने धारावी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी रात्री तिला तिच्या मित्राने फिरण्यासाठी दादर येथे आणले होते. त्यानंतर तो तिला तेथेच सोडून निघून गेला. रात्री तिला एकटीला बसलेली पाहून दोन तरुणांनी तिची चौकशी केली. तुला मित्राकडे नेऊन सोडतो असे सांगितले. नंतर या दोघांनी तिला टॅक्सीत बसवून दादर, वांद्रे परिसरात फिरवले आणि पुन्हा सायन येथे आणले. त्यांनतर त्यांनी तिला धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील रोपवाटिकेत नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या मुलीला घेऊन ते उद्यानाच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरले होते. त्या वेळी मुलीच्या डोक्याला लागून ती जखमी झाली होती. मात्र त्या अवस्थेतही त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. जखमी अवस्थेत दोन्ही आरोपी या मुलीला सोडून पळून गेले.
सोमवारी सकाळी गस्तीवर असलेल्या धारावी पोलिसांना ही मुलगी दिसली. त्यांनी तिची चौकशी केल्यावर ही माहिती समोर आली. धारावी पोलिसांनी या प्रकरणी तिच्या मित्रासह त्या दोन तरुणांविरोधात सामूहिक बलात्कार आणि बाललैंगिक शोषण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.