झटपट पैसे कमविण्यासाठी एखादी लोभी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. पहिला गुन्हा पचला की त्याची भीड चेपते. आपल्याला कुणी काही करू शकत नाही, या आविर्भावात तो पुन्हा तशाच प्रकारचे कृत्य करतो आणि नकळतपणे काही पुरावे मागे सोडतो. त्या पुराव्यांनीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. असाच काहीसा प्रकार कल्याणमधील शहाड भागात धुडगूस घालणाऱ्या आणि निर्दयतेचा कळस गाठणाऱ्या टोळीच्या बाबतीत घडला..

दोन महिन्यांपूर्वीचा कल्याणजवळील शहाड गावातील प्रसंग. या गावातील दरवडे कुटुंबीयांच्या घरात मध्यरात्री चोरटे शिरले. घराचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे बाल्कनीमधून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सर्वजण झोपलेले होते, मात्र प्रिया (२२) ही बेडरूममध्ये अभ्यास करीत होती. चोरटय़ांनी घरातील सर्व खोल्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि त्यानंतर ते प्रियाच्या बेडरूममध्ये शिरले. चोरटय़ांना पाहताच तिने आरडाओरड सुरू केला. त्यामुळे कुटुंबीयांना जाग आली, पण दरवाजा बाहेरून बंद होते. त्यामुळे ते खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच वेळी चोरटय़ांनी तिच्यावर धारधार शस्त्राने वार केले आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याचा हार आणि मोबाइल असा ऐवज लुटून चोरटे पळून गेले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना घडण्यापूर्वी चोरटय़ांनी चार सुरक्षारक्षकांवर हल्ले केले होते. त्यात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला होता. या सर्व घटना चोरीच्या उद्देशातून घडल्या होत्या. आठवडाभरात घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या गुन्ह्य़ांचे गांर्भीय लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेतील विविध युनिटचे अधिकाऱ्यांनी चोरटय़ांचा माग काढण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यांच्या हाती ठोस काहीच लागत नव्हते. असे असतानाच ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या पथकाने सर्वच गुन्ह्य़ांचा सविस्तर अभ्यास सुरू केला. त्यात हे सर्व गुन्हे रात्री १२.३० ते पहाटे ५.३० या वेळेत घडले होते. तसेच जखमी आणि मृतांवर झालेल्या जख्मांची पथकाने पाहणी केली. त्यात सर्वाच्या डोक्यावर आणि तोंडावर वार होते आणि वार करण्याची पद्घत एकच असल्याचे पथकाला दिसून आले. त्यामुळे शहाड भागात गुन्हे करणारी ही एकच टोळी असावी, अशी पोलिसांची खात्री झाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला.
सुरक्षारक्षकांची हत्या झाली, त्या भागात कामगारांच्या खोल्या आहेत. या कामगारांकडे पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी चोरटय़ांनी घरावर दगडफेक केली होती. त्यामुळे अनेकजण घरातून पळून गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी मोबाइल चोरले होते, असे कामगारांकडून पोलिसांना सांगण्यात आले. त्यामुळे चोरीस गेलेल्या मोबाइलच्या आधारे पोलिसांनी चोरटय़ांचा माग काढण्यास सुरुवात केली. मोबाइल कंपन्यांकडून ‘त्या’ सर्व मोबाइल क्रमांकाची माहिती पोलिसांनी मिळविली आणि त्या आधारे पुढील तपासाला सुरुवात केली. चोरीस गेलेल्या पैकी एका मोबाइलवरून कॉल करण्यात आला होता. याच क्रमांकामुळे आरोपींचा माग काढण्यास पोलिसांना धागेदोरे मिळाले. कर्जत भागातील हा क्रमांक होता. या क्रमांकधारकाच्या घरी पोलिसांचे पथक पोहचले आणि पथकाने त्याची सविस्तर चौकशी सुरू केली. या चौकशीदरम्यान एका क्रमांकावर फोन येतो, मात्र त्यातून कोणीच बोलत नाही. परंतु माझ्या मुलीने फोन उचलल्यावर ती व्यक्ती बोलते, असे त्याने पथकाला सांगितले. त्यामुळे पथकाने त्याच्या मोबाइलची पाहणी केली असता, त्यामध्ये अवी (बदललेले नाव) नावाच्या मुलाचे संदेश होते. त्यामुळे पोलिसांनी अवीबाबत विचारणा केली असता, तो कल्याण परिसरातील नातेवाईकांच्या शेजारी राहात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून १५ वर्षीय अवीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चारही गुन्ह्य़ांची कबुली दिली. या गुन्ह्य़ात पोलिसांनी नितीन सखाराम वाघे (१९), नितेश ऊर्फ नित्या भगवान भोईर (२०) आणि रवींद्र ऊर्फ रवी बबन वाघे (२०) अशा त्याच्या तिघा साथीदारांना अटक केली. या टोळीचा म्होरक्या १५ वर्षांचा अवी असल्याचे तपासात उघड झाले. तसेच प्रियावर वार केल्यानंतर ती जखमी अवस्थेत तडफडत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुलीही टोळीने दिली असून या प्रकारामुळे या चौघांनी निर्दयतेचा कळस गाठत एका तरुणीचे आयुष्य संपविले.