अनिताची रेल्वेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून कसलीही छळवणूक झालेली नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी रेल्वेचे निरीक्षक विल्यम केरी यांच्याविरोधात अनिताच्या कुटुंबियांनी तक्रार केली असली, तरी केरी यांनी रेल्वेच्या नियमांचेच पालन करत अनिताला बेकायदेशीरपणे जेटीबीएस जोडणी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी तिची छळवणूक केली, असे म्हणता येणार नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
अनिताने आधी जेटीबीएसचे हक्क आपल्याला नको असल्याचे स्वत:च ११ जुलै २०१३ रोजी रेल्वेला दिलेल्या पत्रात नमूद केले होते. रेल्वेने १५ जुलै रोजी हा अर्ज मान्य करत अनिताला आपली बँक ठेव व कनेक्टिव्हिटी दर परत घेऊन जाण्यास सांगितले. मात्र तिने हे पैसे परत नेले नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. अनिताने या प्रणालीसाठी १३ ऑगस्ट रोजी नव्याने अर्ज केला. तसेच ५ सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहीत आपल्या आधीच्याच ठेवी नव्या अर्जासाठी ग्राह्य धरल्या जाव्यात, अशी विनंती केली. याच महिन्यात रेल्वेने अनिताचे विनंतीपत्र मान्य करत तिला जेटीबीएस परवाना दिला.
मात्र या दरम्यान रेल्वे बोर्डाने जेटीबीएसबाबतच्या नियमांत बदल केले. या बदललेल्या नियमांनुसार बँक ठेव अर्जदाराला परत देणे रद्द करण्यात आले. अनिताने लीज लाइन जोडणीसाठी बीएसएनएलकडे कोणतेही शुल्क न भरल्याने त्यांनी तिला लाइन दिली नाही. याच दरम्यान रेल्वेचे निरीक्षक विल्यम केरी आपल्या पथकासह जेटीबीएस जोडणी करून देण्यासाठी डोंबिवली येथे गेले असता अनिताने त्यांना साध्या एमटीएनएलच्या लाइनवरच जोडणी देण्याची विनंती केली. मात्र ही विनंती रेल्वेच्या नियमांत बसणारी नसल्याने विल्यम यांनी फेटाळून लावल्याचे सूत्रांनी सांगितले.
अखेर अनिताने २० नोव्हेंबर रोजी आपला अर्ज रद्द करावा, असा अर्ज केला. त्याला २१ डिसेंबर रोजी मान्यता देण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी बदललेल्या नियमांनुसार अनिताला बँक ठेव परत देणे नियमबाह्य होते. त्यामुळेच नैराश्य येऊन अनिताने आत्महत्या केली असावी, असे रेल्वेचे म्हणणे आहे.