मुंबईत अंधेरीमधील ओशिवरा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत रहाणाऱ्या एका तरुणीने दारुच्या नशेत गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. लखारीया इमारतीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. तरुणीने पोलिसांसोबत हुज्जत घातली. पोलीस तिला लिफ्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना तिने पोलिसांसमोर कपडे काढून गोंधळ घातला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारुच्या नशेत असलेल्या तरुणीने इमारतीच्या वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितली. त्याने नकार दिला. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलीस इमारतीत दाखल झाले. या तरुणीने पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालत कपडे उतरवण्यास सुरुवात केली.

तिने उलटा पोलिसांवरच आरोप केला. माझी कुठलीही चूक नसताना मध्यरात्री तीन वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी पोलीस येतात हेच मुंबई पोलीस आहेत का ? सोबत महिला कॉन्स्टेबलही नव्हती. संध्याकाळी सात नंतर महिलांना पोलीस घेऊन जाऊ शकत नाही हा कायदा आहे असे या तरुणीने टि्वटमध्ये म्हटले आहे. तिने हे टि्वट मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही केस दाखल केलेली नाही सध्या दोन्ही पक्ष ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये आहेत. ही तरुणी चित्रपट क्षेत्रात काम करत असल्याची माहिती आहे.