‘मी सी लिंकवर आत्महत्या करायला जात आहे, असा व्हॉइस मेल पाठवून एका तरुणाने शनिवारी आत्महत्या केली. कल्पेश राऊत (२८) असे या तरुणाचे नाव असून वरळी कोळीवाडा येथे शनिवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळला.
कल्पेश राऊत हा तरुण चिंचपोकळीच्या कल्याणदासवाडी येथे राहायचा. आग्रीपाडा येथील साई स्पेस मार्ट येथे तो कामाला होता. ‘मी सी-लिंकवर आत्महत्या करायला जात आहे. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नये’, असा संदेश त्याने शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आपल्या भावाला व्हॉइस मेल पाठवला. त्याचवेळी कल्पेशने त्याच्या तीन मित्रांना फोनही केले. पण त्यापैकी केवळ एकाशीच संपर्क झाला. व्हॉइस मेल मिळताच कल्पेशचा भाऊ आणि इतर मित्र पोलिसांना घेऊन वांद्रे येथील सी-लिंकवर निघाले. पण, कल्पेशला फोन केला असता त्याने, मी हाजी अली येथे आहे, असे सांगून फोन कट केला. त्याचा शोध घेत सर्वजण हाजीअली येथे पोहोचले. पण तो सापडला नाही. त्याचा फोनही बंद होता. काळाचौकी पोलीस ठाण्यात कल्पेश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. त्याने शेवटचा फोन केला तेव्हा समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. त्यामुळे पोलीस आणि कल्पेशच्या मित्रांनी शुक्रवार रात्रीपासून शनिवारचा संपूर्ण दिवस गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी आदी सर्व परिसर पालथा घातला. शेवटी शनिवारी संध्याकाळी वरळी कोळीवाडय़ाच्या किनाऱ्यावर कल्पेशचा मृतदेह आढळला.  त्याने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.
शुक्रवारी रात्री ८ वाजता कार्यालय सोडल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. कल्पेश अनाथ होता आणि कल्याणदास वाडीत तो काकींकडे राहात होता. कल्पेश खेळकर आणि मनमिळाऊ असल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. वरळी पोलीस ठाणे याप्रकरणी तपास करीत आहेत.