मुंबईतील उपनगरीय रेल्वेत महिला सुरक्षित नसल्याचे प्रत्यंतर देणारी घटना गुरुवारी पहाटे मीरा रोड व दहिसर या स्थानकांदरम्यान घडली. पहाटे ४.५५च्या सुमारास घडलेल्या या घटनेत एका अज्ञात व्यक्तीने महिलांच्या डब्यातील एका तरुणीला मारहाण करीत तिच्याजवळील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केला असता चोरट्याने आपल्या खिशातून हातोडा काढून तरुणीला मारहाण करण्यास सुरूवात केली आणि तिचे दागिने हिसाकावून नेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भाईंदर येथून चर्चगेटच्या दिशेने पहाटे ४.५० च्या गाडीतील महिलांच्या डब्यात ही २५ वर्षीय तरुणी बसली होती. गाडी मीरा रोड स्थानकात थांबल्यानंतर एक अज्ञात व्यक्ती या डब्यात शिरली. तिने या तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडी दहिसर स्थानकात येईपर्यंत मारहाण सुरू होती. स्थानक जवळ आल्यानंतर हल्लेखोराने तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील सोन्याची बांगडी असे ३१,५०० रुपयांचे दागिने काढून घेत गाडीतून उतरून पळ काढला. त्यानंतर या तरुणीने बोरिवली रेल्वे पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
येथे तिच्या जखमांवर चार टाके घालून तिला सोडण्यात आले.
पोलिसांनी ही तक्रार वसई पोलिसांकडे वर्ग केली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.