प्रत्यक्षात होते रिक्षा चालकाबरोबर प्रेमसंबंध
आपली १७ वर्षांची नात एका तरूणाने पळवून नेल्याची तक्रार राजाजी रोडवर राहणाऱ्या एका आजीने रामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी केली. पोलिसांनी तात्काळ नातीसह त्या तरूणाला अटक केली आणि उघड झाले त्या तरूणीचे तरूणाबरोबरचे प्रेमाचे संबंध. या नाटय़मय घडामोडींनी अपहरणाची तक्रार करणाऱ्या कुटुंबियांच्या तक्रारीचा भोपळाही फुटला.
राजाजी रोडवरील सोसायटीत राहणाऱ्या कांता तपासे (६२) यांनी आपली १७ वर्षांची नात कोपर येथील समतानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या जाकीर बाबुलाल शेख(२१) याने एस. के. पाटील शाळेजवळून पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.  पोलिसांनी तत्काळ तपास करून जाकीरला त्या मुलीसह अटक केली. तपासात या मुलीने आपले चार वर्षांपासून जाकीरबरोबर प्रेमसंबंध आहेत. आजीला हे दोन वर्षांपूर्वी कळले. त्यामुळे आपणास काकाकडे पाठवून देण्यात आले होते. तेथून परत आल्यावर आपले प्रेमसंबंध पुन्हा जुळले, असे कबूल केले.  तिचे पालक श्रीरामपूर येथे राहतात. तर आपण या मुलीला विसरलो होतो पण तीच आपल्या पाठीमागे लागली असल्याची साक्ष जाकीरने पोलिसांना दिली आहे. जाकीर हा रिक्षा चालक आहे.  
अल्पवयीन मुलीने सज्ञान मुलाबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याने पोलिसांनी त्या दिशेने गुन्हा दाखल केला आहे. आजीला मुलीचे प्रेमसंबंध माहिती असूनही अपहरणाची तक्रार का केली याचाही पोलीस शोध घेत आहेत.
गेल्या आठवडय़ात डोंबिवलीत चार रस्त्यावर एका तरूणीने आपला विनयभंग झाला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. परंतु, सकाळी एका मित्राबरोबर फिरणारी ही तरुणी रात्री दुसऱ्याच मित्राबरोबर आइस्क्रिम खात असल्याचे पाहून पहिल्या मित्राने तिला जाब विचारला. त्या दोन्ही मित्रांच्या भांडणातून या तरूणीने एका मित्राला पोलीस ठाण्याची हवा दाखविली असल्याचे  तपासात उघड झाले आहे.  
मुलींना मिळणारी सहानुभती विचारात घेऊन ही प्रकरणे हाताळावी लागतात. पण तरूणी आणि कुटुंबियांकडून त्याचा दुरूपयोग होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.  
सुडाच्या उद्देशाने विनयभंगांच्या काही तक्रारी आता दाखल होत आहेत पण याविषयी उघडपणे बोलता येत नाहीत, असेही उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.