20 September 2020

News Flash

चेंबूरमध्ये महिला पथकांची सर्वाधिक सलामी

महिलांसाठी उभारलेली दहीहंडी फोडण्याचा मान नयन दृष्टिहीन गोविंदा पथकातील मुलींनी पटकावला.

महिला दहीहंडय़ांची संख्याही मोठी असल्याने या महिलांच्या दहीहंडय़ा या ठिकाणी खास आकर्षणाचा विषय ठरल्या होत्या.

यंदा चेंबूर आणि कुर्ला परिसरांत दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात पार पडला. तरुणांसोबत महिला दहीहंडय़ांची संख्याही मोठी असल्याने या महिलांच्या दहीहंडय़ा या ठिकाणी खास आकर्षणाचा विषय ठरल्या होत्या.

चेंबूर येथील मनसेचे नेते कर्नबाळा दुनबळे यांनी सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील चेंबूर नाका परिसरात मोठी दहीहंडी लावली होती. गेल्या वर्षी न्यायालयाचे अनेक नियम तोडल्याने त्यांच्यावर सहा ते सात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे या वर्षी कुठलाही नियम न तोडता त्यांनी शांततेत हा उत्सव पार पाडला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी चुनाभट्टी येथील यश गोविंदा पथकाने आठ थर लावत या उत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर दिवसभरात या ठिकाणी अनेक गोविंदा पथक दाखल झाले. यामध्ये महिला गोविंदा पथकांची संख्यादेखील मोठी होती. दर वर्षीपेक्षा या वर्षी बक्षिसांची रक्कम कमी करून यातील पाच लाख रुपयांचा निधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देणार असल्याचे दुनबळे यांनी सांगितले.चेंबूर परिसरात भाजप, रिपाइं आणि शिवसेनेकडूनही दहीहंडय़ा उभारण्यात आल्या होत्या. मनसे नेता संदीप हुटगी यांच्या परशुराम फाऊंडेशनच्या वतीने कुर्ला परिसरातील सर्वात मोठी दहीहंडी उभारण्यात आली होती. या दहीहंडीची सुरुवातदेखील धारावी येथील ‘अनुष्का स्पोर्ट क्लब’च्या महिला दहीहंडी पथकाने केली.

ढोलताशे तडाडलेच..

पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे सध्या राज्यात डीजे चालक संप सुरू आहे. याचा परिणाम आज दहीहंडीमध्येही पाहायला मिळाला. दहीहंडीमध्ये डॉल्बी नसल्याने सर्वत्र शांततेचे वातावरण होते. त्यामुळे आयोजकांनी यातून तोडगा काढण्यासाठी बॅन्जो आणि ढोल-ताशे पथकांचे दहीहंडीत आयोजन केले होते.

दृष्टीहीन मुलींची कमाल

दादरच्या आयडियल गल्लीत श्री साई दत्त मंडळाने खास महिलांसाठी उभारलेली दहीहंडी फोडण्याचा मान नयन दृष्टिहीन गोविंदा पथकातील मुलींनी पटकावला. या मुलींनी तीन थर लावत हंडी फोडून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. ‘२०१४ पासून दहीहंडीत सहभागी होत असलेले ‘नयन फाऊंडेशन’चे गोविंदा पथक हे महाराष्ट्रातील पहिले दृष्टिहीन पथक आहे. या पथकात मुलींचाही सहभाग मागील तीन वर्षांपासून आहे. मुलांप्रमाणे आम्हालाही दहीहंडी फोडायची आहे, अशी इच्छा पथकातील मुलींनी यंदा व्यक्त केली. म्हणून मग या वर्षी मुलींचे पथकही तयार करण्यात आले. जवळपास तीन महिने या मुली दहीहंडीचा सराव करत आहेत,’ असे संस्थेच्या शार्दूल म्हाडगुत याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 2:23 am

Web Title: girls dahi handi group create a strong presence in chembur and kurla
Next Stories
1 पश्चिम उपनगरांत कोंडी
2 ग्राहक प्रबोधन : ग्राहक संरक्षण कायद्यात स्पष्टता
3 तपासचक्र : खंडणी देण्यासाठी बँकेतून कर्ज
Just Now!
X