राज्याचा बारावी परीक्षेचा (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा) निकाल ७९.९५ टक्के लागला असून, या वर्षीही मुली अव्वल ठरल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निकालामध्ये चार टक्क्य़ांची वाढ झाली आहे. बारावीची परीक्षा प्रथमच घेणाऱ्या कोकण विभागाची कामगिरी राज्यात सर्वोत्तम ठरली आहे. गुणपत्रकांचे वाटप ६ जून रोजी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारीमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. नव्या अभ्यासक्रमाची ही पहिलीच परीक्षा होती. राज्यभरातून या परीक्षेसाठी १० लाख ८८ हजार ६५६ नियमित विद्यार्थी बसले होते. यंदाही मुलींचीच सरशी झालेली दिसत असून ८४.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ७६.६२ टक्के आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९१.३ टक्के, कला शाखेचा निकाल ७०.९२ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ७४.८६ टक्के, तर किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमाचा (एमसीव्हीसी) निकाल ८९.९५ टक्के लागला आहे. या वर्षी १ लाख ८७ हजार ७०३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी होते. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण २९.४७ आहे.
या वर्षी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना उत्तीर्ण होण्यापुरतीच २५ गुणांची सवलत देण्यात आली आहे. या वर्षी ४८५ विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळाला.     संबंधित वृत्त..२

विभागानुसार निकालाची टक्केवारी
* कोकण ८५.८८
*  औरंगाबाद  ८५.२६
*  कोल्हापूर  ८४.१४
*  लातूर  ८३.५४
*  अमरावती  ८२.१९
*  पुणे      ८१.९१
*  नाशिक  ७९.०१
*  मुंबई      ७६.८१
नागपूर ७३.१०

कोकणाची बाजी
या वर्षी कोकण विभागाकडून प्रथमच परीक्षा घेण्यात आली असून या विभागाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. परीक्षेदरम्यान सर्वात कमी प्रमाणात गैरप्रकार (२७) या विभागात घडले. राज्यात परीक्षेदरम्यान एकूण २१५७ गैरप्रकार उघडकीस आले, त्यापैकी १० प्रकरणे तोतयेगिरीची (डमी विद्यार्थी) आहेत.

निकालाची वैशिष्टय़े
*    निकालात ४ टक्क्य़ांनी वाढ
*    खेळाडूंना फक्त उत्तीर्णतेसाठीच  २५ गुणांची सवलत
*    कोकण विभागाकडून प्रथमच स्वतंत्र परीक्षा

मुंबईच्या निकालात सुधारणा नाही
विद्यार्थ्यांना यंदापासून काही ठरावीक विषयांना लागू करण्यात आलेल्या तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांच्या खैरातीनंतरही मुंबईच्या निकालात सुधारणा होऊ शकलेली नाही. त्यामुळे, गेल्या वर्षीप्रमाणे मुंबईचा निकाल यंदाही ७६ टक्क्य़ांच्या आसपासच राहिला आहे. नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर या भागांच्या निकालात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. मुंबईचा निकाल गेल्या वर्षीच्या ७६.१४ टक्क्य़ांवरून किंचितसा सुधारून ७६.८१ टक्के इतका लागला इतकेच.