कांद्याचे भाव गडगडल्याने निर्माण झालेल्या अभूतपूर्व पेच प्रसंगातून मार्ग काढीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी राज्य सरकारने घेतला.

१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत नवी मुंबई वगळता विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या सुमारे ७५ लाख क्विंटल कांद्यासाठी हे अनुदान दिले जाणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत ही मदत मिळणार आहे. त्यापोटी सरकारवर सुमारे दीडशे कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

राज्यात सात लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक आहे. त्यातच शेजारील मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थानातही यंदा कांद्याचे उत्पादन चांगले झाल्याने अन्य राज्यांतूनही कांद्याला मागणी नसल्याने भाव गडगडले आहेत.  खरीप आणि लेट खरिपातील कांद्याची साठवणूक फार दिवस करता येत नसल्याने राज्यात कांद्याचा प्रश्न गंभीर बनला असून योग्य दर  मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनुदानाचा निर्णय घेतला.