एसटी संपात सहभागी झाल्यामुळे बडतर्फची कारवाई करण्यात आलेल्या एक हजार 10 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर उद्धव यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना आवाहन केलं आहे.

त्या एक हजार 10 कर्मचा-यांना पुन्हा एकदा संधी देऊन त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केले आहे. उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांच्यासोबत या प्रकरणी फोनवरुन चर्चा केल्याचीही माहिती आहे. कर्मचाऱ्यांची चूक आहे, मात्र ते आपल्याच परिवारातील आहेत. त्यांना एक संधी द्यायला हवी, असंही उद्धव ठाकरे रावतेंना म्हणाल्याची माहिती आहे.

आठ आणि नऊ जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कर्मचा-यांनी वेतनवाढीसाठी अघोषित संप पुकारला होता. या संपामुळे सरकारचं प्रचंड नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. संपामुळे सामान्य जनतेचे हाल झाले होते. तसेच कर्मचा-यांनी केलेल्या हिंसाचारामुळे जाळपोळ आणि तोडफोड करून अनेक गाड्यांचे नुकसान केले. या हिंसाचारात नव्याने रुजू झालेले अनेक कर्मचा-यांचा समावेश होता. या कर्माचा-यांवर राज्य सरकारने बडतर्फीची कारवाई केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.