शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात

भाजपला धक्का देण्याची तयारी
‘स्मार्ट सिटी’साठी निवड झालेल्या लोअर परळ आणि आसपासच्या परिसरातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी लढा उभारून भाजपला धक्का देण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. आजघडीला लोअर परळमध्ये अनेक कंपन्यांनी कार्यालये थाटली आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी शिवसेनेकडून होऊ लागली आहे.
केंद्राने ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी मुंबईची निवड केली आहे. त्यासाठी पालिकेला एका वर्षांत १०० कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबईमधील लोअर परळमध्ये सेवा-सुविधा उपलब्ध करून या भागाचा विकास करण्यात येणार आहे. विकास होताच लोअर परळमध्ये ६० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा दावा या योजनेत करण्यात आला आहे. मुळात या भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. गिरण्यांच्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. अनेक ठिकाणी टॉवर्स, मॉल्सचा झगमगाट दृष्टीस पडू लागला आहे. काही नामांकित कंपन्यांनी याच भागात कार्यालये थाटली आहेत. तर काही कंपन्या या भागात कार्यालयासाठी जागेचा शोध घेत आहेत.
लोअर परळने कात टाकून विकासाच्या दृष्टीने गती घेतली आहे. त्यामुळेच अनेक कंपन्यांकडून या भागाला पसंती मिळू लागली आहे. परिणामी आतापासूनच या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यास सुरुवात करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. गिरणगावातील लोअर परळ भागात आजही गिरणी कामगारांची मुले वास्तव्यास आहेत. गिरणी कामगारांची मुले उच्चशिक्षण घेऊन नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. घराजवळच्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी विचारणा करण्यास गेलेल्या या तरुणांची बोळवण केली जात आहे. आता अनायसे ‘स्मार्ट सिटी’च्या निमित्ताने या भागात ६० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा केला जात आहे. पण आताच रोजगाराची संधी या भागात उपलब्ध होऊनही स्थानिकांना डावलण्यात येत आहे, असा आरोप करून किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, स्थानिक बेरोजगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये पदवी, पदविका, एमबीए, अभियांत्रिकी यासह तंत्रशिक्षण घेतलेल्या असंख्य तरुणांचा समावेश आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या निमित्ताने चांगली नोकरी मिळेल अशी आशा या तरुणांच्या मनात पल्लवित झाली आहे. या भागात आताच उपलब्ध असलेल्या रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य देऊन ‘स्मार्ट सिटी’ची मुहूर्तमेढ रोवावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.