रामदास आठवले यांची मागणी

मधु कांबळे, मुंबई</strong>

शहरांकडे येणारे लोंढे थांबविण्यासाठी खेडय़ातच उपजीविकेची व्यवस्था करण्याकरिता सर्वच समाजातील भूमिहीनांना कसण्यासाठी जमिनी द्या, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. कमाल जमीन धारणा कायद्यानुसार ज्यांच्याकडे अतिरिक्त जमिनी आहेत, त्यातील काही जमीन सरकारने ताब्यात घ्यावी आणि प्रत्येकी पाच एकर या प्रमाणे भूमिहीनांना वाटप करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

ग्रामीण भागात जातीय अत्याचार होतात म्हणून, तसेच शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी दलित समाजाला खेडय़ाकडून शहरांकडे चला, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. मात्र रामदास आठवले दलितांना आता खेडय़ातच राहण्याचा पर्याय देत आहेत. बाबासाहेबांच्या या संदेशाकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ‘लोकसत्ता’शी बोलताना ते म्हणाले की, त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. त्या वेळी अत्याचार जास्त होत होते. आताही अत्याचार होतात, परंतु त्याचा प्रतिकार करण्याचे बळ दलित समाजाला मिळाले आहे. दुसरे असे की, शहराकडे येऊन लोक कुठे राहतात, तर झोपडपट्टीत आणि दहा-पंधरा हजाराची कंत्राटी नोकरी करतात. झोपडपट्टय़ांमधील असे दयनीय जीवन जगण्यापेक्षा गावातच त्यांना जमीन दिली, तर त्यांना उपजीविकेचे एक साधन मिळू शकते. जमिनीबरोबर सिंचनाची व्यवस्था केली, तर चांगले उत्पन्न मिळेल, त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता वाटणार नाही.

राज्य सरकारने कमाल जमीन धारणा कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. कायद्यातील पळवाटा शोधून अनेक लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने जमिनी केल्या आहेत. राज्य सरकाने या संदर्भात एक समिती स्थापन करून, अतिरिक्त जमिनींचा शोध घ्यावा. ज्यांच्याकडे अतिरिक्त जमीन आहे, ती काढून घेऊन सर्वच समाजातील भूमिहीनांना त्याचे वाटप करावे, अशी आठवले यांची सूचना आहे. गायरान आणि झुडपी जंगलांनी व्यापलेली ९२ हजार एकर जमिनीचेही भूमिहीनांना वाटप करता येईल, राज्य सरकारने त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दलित समाज मोदींच्या बाजूने असल्याचा दावा

गेल्या चार वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने दलित समाजाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या. इंदू मिलच्या जमिनीवर ७६३ कोटी रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. बाबासाहेबांनी वास्तव्य केलेली लंडनमधील इमारत ताब्यात घेऊन तिचे स्मारकात रूपांतर केले आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील कडक तरतुदी कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दलित समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभा राहील, असा दावा रामदास आठवले यांनी केला. काँग्रेसने महाआघाडी केली, तरी त्याचा निभाव राष्ट्रीय लोकशाही आघाडीपुढे लागणार नाही, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.