पक्षाचे नेतृत्व किंवा मंत्र्यांवर आरोप झाल्यावर कोणीही प्रत्युत्तर द्यायचे नाही वा बचावात्मक भूमिका घ्यायची हे आता पुरे झाले. यापुढे विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर द्या, असे फर्मान राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी बुधवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोडले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नवे प्रदेशाध्यक्ष जाधव आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि निरीक्षकांची बैठक आयोजित केली होती. पक्षाच्या नेत्यांवर नेहमीच आरोप केले जातात. मात्र आरोपानंतर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बचावात्मक का होतात, असा सवाल जाधव यांनी केला. भाजपच्या काही नेत्यांनी खोटेनाटे आरोप सुरू केले आहेत. पण यापुढे गप्प न बसता विरोधकांच्या आरोपांना जशास तसे उत्तर द्या, मात्र त्यासाठी कायदा हातात घेऊ नका असा सल्ला जाधव यांनी दिला.
शिवसेना-भाजपसारख्या जातीयवादी पक्षांबरोबर स्थानिक पातळीवर हातमिळवणी करू नका, असे आवाहन करीत निधर्मवादी शक्ती अधिक संघटीत करण्यावर कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी भर दिला.
यापुढे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत, असे सांगत कोणचाही मुलाहिजा न राखता सडेतोडपणे त्याला उत्तर दिले जाईल,असा इशारा दिला.
काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्यात येणार असल्याने काँग्रेसच्या विरोधात नाहक तक्रारी करू नयेत, असेही आवाहन करण्यात आले. आघाडीत राष्ट्रवादी २२ जागा लढणार असून, यापैकी १६ जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. राज्यात राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी सर्वानी कसून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जाधव आणि आव्हाड यांनी सांगितले.