आनंददायी शिक्षण व सातत्यपूर्ण मुल्यांकनाच्या प्रशिक्षणासाठी ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती केल्याने वर्ग ओस
‘सर्व शिक्षा अभियाना’अंतर्गत आनंददायी शिक्षण व सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकनाच्या प्रशिक्षणासाठी मुंबईतील जवळपास ५० टक्के शिक्षकांना आपल्या वर्गावर सक्तीची दांडी मारावी लागणार असल्याने मुंबईतील तीन हजार शाळांमध्ये सोमवारपासून पुढील पाच दिवस ‘आनंदीआनंद’ असणार आहे.
शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना सर्वच शाळांमध्ये शिक्षक फेब्रुवारी महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या धांदलीत असतात. या शिवाय बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने त्याचीही तयारी शिक्षकांना करावी लागते आहे. त्यात तब्बल पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला हजेरी लावण्याची सक्ती शिक्षकांवर करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असल्याने सर्व शिक्षा अभियानासाठी मिळालेला निधी संपविण्यासाठी हा प्रशिक्षणाचा खटाटोप केला जात आहे, अशी चर्चा आहे. पण, यात शिक्षकांची विनाकारण ससेहोलपट होत असून त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसतो आहे. मुंबईतील सर्व शाळांमधील पाचवी ते आठवीच्या तब्बल ५० टक्के शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे. एकाच वेळेस इतके शिक्षक गैरहजर राहणार असल्याने शाळा चालवायची कशी, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर आहे. तर गैरहजर शिक्षकांचेही वर्ग सांभाळण्याची जबाबदारी उर्वरित शिक्षकांवर आल्याने त्यांची धांदल उडते आहे. गिरगावमधील एका शाळेत शिक्षकांनी काही पालकांनाच ‘वर्गात मदतीला या’ असे आवाहन केले आहे. तर एका शाळेत गैरहजर शिक्षकांच्या वर्गातील मुलांनी दंगा करू नये म्हणून भगतसिंगांवरील चित्रपट शाळेत लावून देण्यात आला होता.
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदी, सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यांकन पद्धती, आनंददायी शिक्षण, मीना मंच उपक्रम आदींची माहिती करून देण्यासाठी सीएसटी ते दादर (दक्षिण विभाग) आणि दादर ते दहिसर (पश्चिम विभाग) या विभागांमधील शाळा शिक्षकांसाठी ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान तर मुलुंड ते चेंबूपर्यंतच्या उत्तर विभागाचे प्रशिक्षण २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
शिक्षकांना दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सर्व शिक्षा अभियानाच्या केंद्र संमेलनांना हजेरी लावावी लागते. सकाळी ७ ते १०.४५ ही शाळेची वेळ सांभाळून पुन्हा साडेअकरा ते चार या काळात संमेलनाला उपस्थित राहावे लागते. यात आता पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भर पडल्याने त्यांच्यात चांगलीच नाराजी आहे. शनिवार-रविवारची सुट्टी असताना ही प्रशिक्षणे घ्यायला काय हरकत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानही टळेल, अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने व्यक्त केली.
शाळा सुरू राहातील..
‘सर्व शिक्षा अभियान’ राबविण्याची जबाबदारी असलेल्या ‘महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदे’च्या (एमपीएसपी) सूचनेवरून ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन परिषदे’तर्फे महाराष्ट्रभर ही प्रशिक्षणे घेतली जातात. या बाबत प्रकल्प संचालक (सर्व शिक्षा अभियान) ए. डी. काळे यांच्याशी संपर्क साधला असता शाळांची अडचण होत असल्यास एससीआरटीईला प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घ्यायला लावू, असे स्पष्ट केले. ‘प्रशिक्षणामुळे शाळा बंद राहणार नाही या दृष्टीने वेळापत्रक बदलून घेण्याची सूचना करू,’ असे ते म्हणाले.