21 September 2020

News Flash

मेट्रो फलाटांवर काचेची भिंत

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट या मेट्रो मार्गावर पाहावयास मिळणार आहे.

गाडी थांबल्यावरच भिंतीतील दारे उघडण्याची व्यवस्था

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या रेल्वेच्या रुळांवर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असताना, अशी परिस्थिती मेट्रो मार्गावर निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. कुलाबा ते सीप्झ या मुंबई मेट्रो-३च्या स्थानकांची उभारणी करताना फलाटांवर ‘प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर’ उभारण्यात येणार आहेत. मेट्रोगाडी स्थानकात थांबल्यानंतरच या काचेच्या भिंतीतील दारे खुली होतील. अन्य वेळी ही दारे स्वयंचलित यंत्रणेमुळे बंद ठेवण्यात येतील.

अत्याधुनिक सोयीसुविधा आणि प्रवाशांची सुरक्षा ही प्रमुख उद्दिष्टय़े डोळ्यासमोर ठेवून मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट या मेट्रो मार्गावर पाहावयास मिळणार आहे. ती म्हणजे या मार्गावरील स्थानकांवर काचेची भिंत असणार आहे. त्याला ‘प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स’ असे म्हटले जाते. यामध्ये गाडी मेट्रो स्थानकात आल्यावर ज्याप्रमाणे गाडीतील डब्यांची दारे उघडतात त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवरील दारेही उघडतील. ही दारे उघडल्यावरच  प्रवासी गाडीत प्रवेश करू शकतो. तोपर्यंत प्रवाशाला ट्रॅकवर जाता येणे शक्यच होणार नाही. अशा प्रकारचे तंत्रज्ञान परदेशातील बहुतांश मेट्रो मार्गावर वापरण्यात आले आहे. भारतात नुकतेच दिल्ली मेट्रो मार्गावरील पिवळ्या मार्गिकेवर अशा प्रकारच्या काचेच्या भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र यांची उंची तुलनेत कमी आहे.

मुंबई मेट्रो-३ या प्रकल्पातील सर्व २६ स्थानकांवर सात ते आठ फूट उंचीच्या या भिंती उभारण्यात येणार आहे. या भिंती उभारण्यासाठीची निविदा प्रक्रिया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुरू केली आहे. सर्व स्थानकांवर अशा प्रकारच्या भिंती उभारण्यासाठी

अंदाजे ९५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या भिंतीचा उपयोग सुरक्षेबरोबरच प्लॅटफॉर्मवरील वातानुकूलित यंत्रणा सक्षमपणे काम करण्यास होणार आहे.

मुंबई लोकल मार्गावर ट्रॅकवर पडून मृत्युमुखी होणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे. मेट्रो मार्गावर अशा प्रकारच्या कोणत्याही घटना होऊ नये यासाठी आम्ही सर्वच स्थानकांवर ‘प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स’ बसविणार आहोत. जेणेकरून प्रवासी थेट ट्रॅकवर जाऊच शकणार नाही. यामुळे ट्रॅकवरील अपघातांची कोणतीही भीती राहणार नाही.

– अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 3:29 am

Web Title: glass wall on mumbai metro platforms
Next Stories
1 देवनारमध्ये दीड लाख बकऱ्यांची आवक
2 शहरबात ; रेरा आला.. पुढे काय?
3 प्रसादाच्या ‘शुद्धीकरणा’साठी मोहीम
Just Now!
X