१५ कोटींच्या भाडेमाफीविषयीचे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे

द ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅण्ड लिडरशिप फाऊंडेशन आयोजित ‘ग्लोबल इंडिया कल्चरल फेस्टिव्हलसाठी’ वांद्रे- कुर्ला संकुलातील बीकेसी मैदान तब्बल एक महिना मोफत द्यावे यासाठी आयोजक आणि मंत्रालयातूनही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) दबाव आणला जात आहे. विशेष म्हणजे या मैदानासाठी एमएमआरडीएने आयोजकांना १५ कोटी रुपये भाडे भरण्याच्या सूचना केल्या असल्या तरी आता सरकारकडूनच दबाव येऊ लागल्याने ते माफ करण्याबाबतचा चेंडू प्राधिकरणाने मुख्यमंत्र्यांकडे टोलवत आपली सुटका करून घेतली आहे.

‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवात तरुणांचे आकर्षण असलेल्या ‘कोल्ड प्ले’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाबरोबरच बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील नामवंत कलाकारांचा कार्यक्रम बीकेसीच्या मैदानावर १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सुमारे सहा-सात तास रंगणाऱ्या या कार्यक्रमाचा आस्वाद देश- विदेशातील किमान दीड लाख लोक घेतील असा आयोजकांचा दावा आहे. त्यासाठी या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘जान प्रोजेक्टस लि.’ या कंपनीने एमएमआरडीएकडे २४ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीसाठी २० हेक्टर जागेची मागणी केली आहे. बीकेसीतील मुख्य मैदानाबरोबरच अन्य काही छोटी मैदानेही मागण्यात आली आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने देश आणि विदेशातील सुमारे एक लाख पर्यटक मुंबईत येणार असून त्यातून सरकारला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सुमारे १३० कोटींचा महसूल मिळेल, शिवाय एमएमआरडीएचे नाव जगभरात पोहोचेल. त्यामुळे कार्यक्रमासाठी आवश्यक जागा मोफत देण्याची मागणी या कंपनीने केली आहे. विशेष म्हणजे पर्यटन विभागानेही या कार्यक्रमासाठी मोफत मैदान उपलब्ध करून देण्याची विनंती एमएमआरडीएला केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ ऑगस्ट रोजी एक बैठक घेऊन या कार्यक्रमासाठी ‘सर्वतोपरी सहाय’ करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्यानंतर महसूल, पर्यटन व अन्य विभागांच्या स्तरावर आवश्यक मंजुऱ्या, सवलती व शुल्कमाफीच्या प्रस्तावांवर हालचाली सुरू आहेत. पर्यटन विभागाबरोबरच मुख्यमंत्री कार्यालयातूनही या कार्यक्रमाचा पाठपुरावा केला जात असल्याने एमएमआरडीएने एक महिन्यासाठी हे मैदान राखून ठेवले आहे. मात्र हे मैदान मोफत दिल्यास उद्या कोणीही न्यायालयात जाईल, त्यामुळे अधिकारी अडचणीत येथील अशी भूमिका घेत प्राधिकरणाने मैदानाच्या भाडय़ापोटी सुमारे १५ कोटी रुपये भरावे लागतील, असे संयोजकांना कळविले आहे. तसेच मुख्य मैदानासाठीचे ६ कोटी रुपये भरण्याचे पत्रच कंपनीस पाठविल्याचे समजते. त्यानंतर आयोजकांनी या कार्यक्रमामुळे प्राधिकरणाचा फायदाच होणार असल्याचे सांगत पुन्हा मंत्रालयातून दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्राधिकरणाने नसती ब्याद आपल्यावर नको म्हणून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तिकीट दर पाच हजार ते पाच लाख रुपये

या कार्यक्रमासाठी पाच लाखांची  ५०, अडीच लाखांची १००, तर एक लाखाची २०० खास तिकिटे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय पाच हजार, सात हजार, १० हजार, १५ हजार, २५ हजार, ५० हजार असे तिकिटांचे दर आहेत.