व्यापाऱ्यांसह पालिके चाही महसुल बुडणार

मुंबई : दरवर्षी देवनार पशुवधगृहात बकरी ईद निमित्त मोठय़ा प्रमाणात बकऱ्यांचा बाजार भरतो. मात्र यावर्षी करोनामुळे हा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी येथील करोडो रुपयांची उलाढाल ठप्प होणार असून याचा मोठा फटका पालिका आणि व्यापाऱ्यांना बसणार आहे.

सुमारे ६५ एकर जागेत वसलेल्या देवनार पशुवधगृहात रोज तीन लाख बकऱ्यांची कत्तल करून, या मांसाची मुंबई शहरातील विविध दुकानात विक्री केली जाते. यातून मुंबई महापालिकेला मोठा नफा मिळतो. त्यातही बकरी ईदच्या काळात मांसाला अधिक मागणी असते. मागच्या वर्षी २ लाख २५  हजार इतक्या बकऱ्यांची देवनार पशुवध गृहात आयात झाली होती. यातून पालिकेची केवळ १५ दिवसात २ कोटी २५ लाखांची कमाई झाली होती.

यावर्षी करोनामुळे देवनार पशुवधगृहातील हा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारने परिपत्रक काढून दिल्या आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. बकरी ईदला बकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने, अनेक व्यापारी बकरी ईदची वाट पाहत असतात. मात्र यावर्षीच्या बंदीमुळे मोठे नुकसान होणार असल्याची माहिती रियाज शेख या व्यापाऱ्याने दिली दिली आहे. याशिवाय बकरी ईदच्या दरम्यान बकऱ्यांची ने-आण करणारे वाहनचालक, बकऱ्यांसाठी खुराक पुरवणारे आणि हॉटेल व्यवसायिक यांचाही रोजगार बुडाला आहे.