प्रतिमा हटविण्याच्या आदेशाची अंमलबजावणी होण्याची शक्यता धूसर

राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे पालन करण्यासाठी सरकारी कार्यालयांतून देवदेवतांच्या प्रतिमा हटविण्याचे आदेश सरकारने जारी केले असले, तरी मंत्रालयाच्या प्रत्येक दालनात देवतांचे वास्तव्य कायमच असून मंत्रालयातच या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्याने, या आदेशाची सरकारी पातळीवर शेवटच्या कार्यालयापर्यंत अंमलबजावणी होण्याची शक्यताच संपुष्टातच आली आहे.

मंत्रालयाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर लगेचच देवतांचे अस्तित्व दिसू लागते. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक वाहनात गणपतीची मूर्ती विराजमान असते, तर पहिल्या मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत अनेक दालनांत देव्हाऱ्यांमध्ये देवतांच्या मूर्ती-प्रतिमा विराजमान झालेल्या दिसतात. कपाटाचे दरवाजे, केबिनच्या प्लायवूडच्या पार्टिशनांवर वर्षांनुवर्षांपासून देवतांच्या प्रतिमा इतक्या घट्ट चिकटवून बसविल्या गेल्या आहेत, की त्यांना सन्मानपूर्वक हटविणे शक्यच होणार नाही. त्या प्रतिमा दूर करावयाच्या झाल्यास खरवडल्या जातील व तसे करणे कोणासही भावनिकदृष्टय़ा शक्य नाही, असा दावा मंत्रालयातील कर्मचारी करतात. अनेक कर्मचारी सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपापल्या टेबलाजवळील प्रतिमेस मनोभावे नमस्कार करतात, काही कर्मचारी तर दालनांतील देव्हारे फुलांनी सजवितात, ‘दिवस चांगला जावा’ यासाठी देव्हाऱ्यांमध्ये अगरबत्त्या लावून मगच कामाला सुरुवात करतात, त्यामुळे हे नाते एका आदेशामुळे तोडणे शक्य नाही, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांपर्यंत आणि मुख्य सचिवांपासून कक्ष अधिकाऱ्यांपर्यंत जवळपास प्रत्येक दालनात आजही देवतांच्या प्रतिमांचे दर्शन घडते. काही दालने तर ‘लक्ष्मीची मंदिरे’ वाटावीत एवढय़ा साजिरेपणाने सजविली गेली आहेत. विस्तार इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील वित्त विभागाच्या एका कार्यासनामध्ये देव्हाऱ्याभोवती विजेच्या दिव्यांच्या माळा दिवसभर तेवताना दिसतात. याच मजल्यावर प्रधान सचिव सुनील पोरवाल यांच्या दालनात गणपतीची प्रसन्न  प्रतिमा दरवाजाबाहेरूनही अभ्यागतांना दर्शन देते. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दालनाशेजारी प्रधान सचिव विजय कुमार यांचे कार्यालय आहे. येथे प्रवेश करताच लालबागच्या राजाच्या प्रतिमेचे दर्शन घडते, तर उच्च व तंत्रशिक्षण सचिव सीताराम कुंटे यांच्या दालनात देवीची भव्य प्रतिमा दिसते. मंत्रालयाच्या जवळपास प्रत्येक दालनातच देवतांच्या प्रतिमांचे अस्तित्व आहे. याआधीही सरकारने प्रतिमा हटविण्याचे आदेश जारी केलेच होते, तरीही या प्रतिमा मंत्रालयातून हटलेल्या नाहीत, असे पाचव्या मजल्यावरील एका सचिवाच्या दालनाबाहेरील चपराशाने सांगितले. सरकारच्या आदेशामुळे आता कदाचित दिवाळी, दसऱ्यासारख्या सणांना दालनात केली जाणारी रोषणाई कमी होईल, पण प्रतिमा हटणार नाहीत, असे हा चपराशी म्हणाला. तसेही, जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याच्या संगणकाच्या पडद्यावरच देवतांच्या प्रतिमांचाच ‘होमस्क्रीन’ असल्याने, त्याचे दर्शन घेऊनच कर्मचारी कामाला सुरुवात करतात व त्या प्रतिमा हटविणे शक्यच नाही, असेही या कर्मचाऱ्याने विश्वासाने सांगितले.