पर्यटनाच्या बाबतीत ‘देवभूमी’ असे वर्णन करून घेणाऱ्या केरळमधील ‘टॅक्सी असुरांनी’ केसरी टूर्सच्या पर्यटकांना रविवारी छळछळ छळले. तिरुवअनंतपूरम विमानतळाबाहेर ‘केसरी’च्या ३० पर्यटकांना कन्याकुमारीकडे घेऊन जाणाऱ्या बसवर स्थानिक टॅक्सीवाल्यांनी चढाई केली व बसचालकाला पिटाळून लावले. या पर्यटकांना आमच्या टॅक्सीतूनच घेऊन जावे, असे दरडावत ‘केसरी’च्या यात्राचालकासही धक्काबुक्की करण्यात आली. टॅक्सीवाल्यांच्या या दादागिरीपुढे नमते घेत यात्राचालकाने अखेर सर्व प्रवाशांना टॅक्सीने जवळच्या हॉटेलपर्यंत पोहोचवले.
‘केसरी’तर्फे केरळ सहलीला जाणाऱ्या प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून या समस्येचा वारंवार सामना करावा लागत आहे. तिरुवअनंतपूरमच्या विमानतळावर या प्रवाशांचे आगमन झाल्यानंतर पुढील प्रवासासाठी त्यांच्या दिमतीला केरळमधीलच एक बस दिली जाते, मात्र यामुळे आपला रोजगार बुडत असल्याचे सांगत येथील टॅक्सी संघटनांनी याला विरोध केला आहे. रविवारी हे टॅक्सीवाले थेट हमरीतुमरीवर उतरले. विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या ‘केसरी’च्या बसला त्यांनी घेराव घातला व बसचालकाला धमक्या देत पिटाळून लावले. तसेच प्रवाशांनी आमच्या टॅक्सीनेच प्रवास करावा, असे सांगत धुडगूस घालायला सुरुवात केली, अशी माहिती या सहलीतील पर्यटक डॉ. जितेंद्र जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
टॅक्सीवाल्यांची अरेरावी गेल्या चार-पाच यात्रांपासून काळजीचा विषय ठरत आहे. मात्र आम्हाला त्यांच्या दादागिरीपुढे सातत्याने नमते घ्यावे लागत आहे. रविवारचा प्रकार अत्यंत भयप्रद होता. शेवटी आम्हाला ८ किलोमीटरवर असलेल्या एका उपाहारगृहापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना टॅक्सीने पाठवावे लागले, असे ‘केसरी’चे यात्रा संचालक निनाद वर्तक यांनी सांगितले.
स्थानिकांकडून नेहमीच अरेरावी
स्थानिक टॅक्सीवाल्यांकडून अरेरावीची भाषा ही काही एका प्रांताची मक्तेदारी नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ठिकाणी असा त्रास सुरू असतो. प्रत्येक राज्याला भरमसाट कर देऊनही आमच्या वाहनांना सुरक्षा मिळणार नसेल, तर मग फायदाच नाही. सध्या देशभरात पर्यटनासाठी चांगले दिवस आल्याची चर्चा झडत असताना प्रत्यक्षात मात्र अशी परिस्थिती आहे.
शैलेश पाटील, व्यवस्थापकीय संचालक, केसरी