22 July 2019

News Flash

गोकुळदास तेजपाल रुग्णालय शोकाकुल

कर्मचाऱ्यांनी एक शोकसभा आयोजित करून या तिघींना श्रद्धांजलीही वाहिली. पण त्या धक्क्य़ातून कोणीही सावरू शकलेले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

तीन परिचारिकांच्या मृत्यूचा कर्मचारीवर्गाला जबर धक्का

हिमालय पूल दुर्घटनेत बळी गेलेल्या सहापैकी तीन महिला ज्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात कार्यरत होत्या, त्या रुग्णालयात शुक्रवारी नेहमीचे कामकाज सुरू होते, पण त्यात नेहमीचा उत्साह अजिबात नव्हता. रुग्णालयातील तीन सहकाऱ्यांच्या मृत्यूचा ताण येथील प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कर्मचाऱ्यांनी एक शोकसभा आयोजित करून या तिघींना श्रद्धांजलीही वाहिली. पण त्या धक्क्य़ातून कोणीही सावरू शकलेले नाही.

गोकुळदास तेजपाल अर्थात ‘जीटी’ रुग्णालयातील रात्रपाळीकरिता येत असतानाच अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे या परिचारिका पूल दुघर्टनेत मृत्युमुखी पडल्या. रुग्णालयातील परिसेवक विजय भागवत हेही या दुर्घटनेत जखमी झाले. पूल कोसळल्यानंतर बचावकार्य सुरू असतानाच भागवत यांनी अपूर्वा आणि रंजना यांना ओळखले व त्यांना जीटीमध्येच न्या, अशी विनंती बचावकार्य करणाऱ्यांना केली. तर भक्ती शिंदे यांना सेंट जॉर्जेस रुग्णालयात नेण्यात आले होते. या तिघींचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयावर शोककळा पसरली. यापैकी एक परिचारिका शस्त्रक्रिया विभागात काम करणारी होती. तिच्या मृत्यूचा अन्य सहकाऱ्यांना इतका मानसिक धक्का बसला की, रुग्णालयातील काही शस्त्रक्रिया शुक्रवारी लांबणीवर टाकण्यात आल्या, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तायडे यांनी दिली.

जीटी रुग्णालयात एकूण १० जखमी दाखल असून त्यात महेश शेट्टे, निलेश पटावकर या दोन पोलिसांचाही समावेश आहे. मात्र या दोघांना मुंबई रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती अधिष्ठात्यांनी दिली. तर सध्या ७ जखमी जीटी रुग्णालयात दाखल आहेत.

First Published on March 16, 2019 12:42 am

Web Title: gokuldas tejpal hospital heartbreaking