रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटना दररोज मुंबईच्या विविध ठिकाणी घडत असतात. परंतु कुर्ला येथे बसमध्ये बसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या सोनसाखळीची किंमत सुमारे ३७ हजार आहे.
बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ज्योती जाधव (५४) या (बेस्ट क्रमांक २२)बसमधून परळहून मरोळकडे निघाल्या होत्या. वाहनचालकाच्या मागील बाजूवरील खिडकीजवळील आसनावर त्या बसल्या होत्या.
ही बस कुल्र्याच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरून जात असताना फौजिया रुग्णालयासमोर वाहतुकीमुळे बसचा वेग मंदावला. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने बाहेरून हात घालून जाधव यांच्या गळ्यातील ३७ हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोनसाखळी खेचून घेतली.
जाधव यांना मदतीसाठी आरडाओरडा करण्यापूर्वीच तो चोरटा गर्दीतून पसार झाला. रस्त्यावर गर्दी असल्याने कोणालाही चोरटय़ाला पकडण्याचा प्रयत्न करता आला नाही. काही मिनीटांत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे या महिलेसह बसमधील सर्व प्रवासी चकित झाले.
विनोबा भावे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बसमधून प्रवास करतानाही महिलांनी यापुढे काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.