महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने केलेल्या मोठय़ा कारवाईत रविवारी ३२.२८७ किलो वजनाचे चोरटे सोने पकडण्यात आले. या सोन्याची किंमत १०.६ कोटी रुपये इतकी असून भारत-म्यानमार सीमेवरुन तस्करी करुन आणलेल्या सोन्याचा यात समावेश आहे.

सांताक्रूझ येथील कॉनकोर एअर लिमिटेड येथे आलेल्या १२ कार्गो कन्साईनमेन्टमध्ये संचालनालयाने हस्तक्षेप करुन त्याची तपासणी केली असता देशभरात वाहतूक व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी काळबादेवी येथील शाखांसाठी माल पाठवला असल्याचे उघडकीस आले.  यातील परदेशी सोने हे देशभरातील वेगवेगळ्या भागात तस्करी करुन आणले गेले आणि मग देशांतर्गत विमान वाहतूकीच्या माध्यमातून मुंबईला पाठवण्यात आल्याचे उघडकीस आले. वाहतूक सुविधा पुरवणाऱ्या या कंपन्याना आलेला माल कार्गो टर्मिनल येथून जमा करत आणि झवेरी बाजारात विकत असल्याचे समोर आले आहे. सत्रावाला लॉजिस्टिक, न्यू अशोक पार्सल अ‍ॅण्ड लॉजिस्टीक, अंबे एक्सप्रेस लॉजिस्टिक, नापलोग लॉजेस्टिक, भवानी लॉजिस्टिक, जय माता एअर सव्‍‌र्हिसेस आणि योगिता लॉजिस्टिक अशी या वाहतूक सुविधा देणाऱ्या कंपन्यांची नावे आहेत. ज्यांच्या नावे हे सोने नोंदवण्यात आले होते ते आणि वाहतूक सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांचे मालक यांनी तस्करीला मदत करत असल्याचे कबूलीजबाबात मान्य केले आहे. तीन कंपन्यांच्या प्रतिनिधींना ३० जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.