10 July 2020

News Flash

लॅबर्नम रस्त्याची ‘सुवर्णकिनार’ नामशेष होण्याच्या मार्गावर!

एकेकाळी पिवळ्या फुलांनी बहरणाऱ्या रस्त्यावर बहाव्याची पाचच झाडे

एकेकाळी पिवळ्या फुलांनी बहरणाऱ्या रस्त्यावर बहाव्याची पाचच झाडे; रस्त्याला पूर्वझळाळी देण्यासाठी पालिकेचा पुढाकार

मुंबई : एकेकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बहाव्याच्या झाडांवरील पिवळ्या फुलांमुळे ‘सुवर्णमय’ वाटणारा दक्षिण मुंबईतील ‘लॅबर्नम रोड’ आता उजाड भासू लागला आहे. येथील बहुतांश बहाव्याची झाडे काळाच्या पडद्याआड गेली असून सध्या तेथे केवळ बहाव्याचे पाच वृक्ष शिल्लक आहे. या रस्त्याला सुवर्णकिनार मिळवून देणाऱ्या या झाडांच्या संवर्धनासाठी महापालिकेने आता पावले उचलली असून या ठिकाणी नव्याने बहाव्याची झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे.

दक्षिण मुंबईमधील गावदेवी परिसरातील लॅबर्नम रोडवरील मणी भवनमध्ये महात्मा गांधीजी सुमारे १६ ते १७ वर्षे वास्तव्यास होते. त्यामुळे लॅबर्नम रोड अनेकांना परिचित आहे. मुंबई इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्टने साधारण १९१० साली गावदेवी परिसरात मोठय़ा प्रमाणावर बहाव्याच्या झाडांची (लॅबर्नम ट्री) लागवड केली. हळूहळू बहावा बहरू लागला आणि एप्रिल-मेदरम्यान पिवळ्या धम्मक फुलांनी रस्ता सजू लागला. बहाव्याच्या निमित्ताने या रस्त्याला सुवर्णझळाळी येऊ लागली. त्यामुळे या रस्त्याचे ‘लॅबर्नम रोड’ असे नामकरण करण्यात आले. वसंत ऋतू सुरू होताच नाजूक पिवळ्या रंगाच्या पाकळ्यांच्या फुलांनी बहावा बहरू लागला. झुंबराप्रमाणे झाडाला लटकून हवेत हेलकावे खाणारी बहाव्याची पिवळी फुले अनेकांना मोहून टाकत. गळून पडणाऱ्या फुलांचा पिवळा गालिचा रस्त्यावर पसरत होता. बहावाचा एक विशिष्ट मंद सुगंध या परिसरात दरवळे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लॅबर्नम रोडवरील हा सुवर्णसडा हरपला आहे.

‘लॅबर्नम’ अस्तागत होण्याला रस्त्यावर लावण्यात आलेले अन्य वृक्ष जबाबदार आहेत. नव्याने लावलेले हे वृक्ष उंचच उंच वाढत गेल्यामुळे त्यांच्या सावलीत बहाव्याची झाडे कोमेजून गेली. आता बहाव्याची केवळ पाच झाडे शिल्लक आहेत. बहाव्यामुळे मिळालेले गतवैभव लॅबर्नम रोडला परत मिळवून देण्याची मोहीम ‘डी’ विभागाने हाती घेतली आहे. त्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागातील उद्यान विद्या साहाय्यक अंजनी भावसार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती ‘डी’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. शिल्लक राहिलेल्या बहाव्याच्या पाच झाडांचे संवर्धन करण्यात येणार आहे. तसेच पाच झाडांची लागवडही करण्यात येणार आहे, असे गायकवाड म्हणाले.

पर्यटन रस्ता बनवणार

लॅबर्नम रोडचा ‘हेरिटेज वॉक’मध्ये समावेश आहे. तिथले पुरातन रूप जपण्यासाठी पदपथांवर बसविलेले पेवर ब्लॉक काढून तेथे कोबल स्टोन बसविले जाणार आहेत. पदपथांवरील सेवा उपयोगिता सुविधा वृक्षांदरम्यानच्या मोकळ्या जागेत हलवून पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळा करण्यात येणार आहे. त्यावर पादचारी तसेच अपंगस्नेही सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 2:46 am

Web Title: golden showers missing on laburnum road in south mumbai zws 70
Next Stories
1 कंत्राटे देऊनही तीन पूल अधांतरी
2  जुन्या बेअरिंग काढण्यात विलंबामुळे वेळापत्रक फिस्कटले!
3 हार्बर प्रवाशांना एप्रिलपासून दिलासा?
Just Now!
X