गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केल्याबद्दल स्थानिक आमदार गोपाळ आगरवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष व अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांना तीन दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्याचा आदेश प्रदेश काँग्रेसने शनिवारी दिला.
गोंदियात भाजपशी संगनमत केल्याने काँग्रेसची नाचक्की झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आमदार आगरवाल व अन्य पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी चर्चा केली. भाजपशी हातमिळवणी करण्याच्या प्रकाराबद्दल चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तीन दिवसांत लेखी खुलासा करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत. त्यांचे स्पष्टीकरण आल्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले, तर आगरवाल यांनी या घडामोडींशी आपला काहीही संबंध नाही. निवडून आलेल्या सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा युक्तिवाद केल्याचे समजते.