भाजपबरोबर हातमिळवणी करू नये, असे सक्त आदेश देऊनही गोंदिया जिल्हा परिषदेतील विषय समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी पक्षादेश डावलून भाजपबरोबरच जुळवून घेतल्याने काँग्रेसची पंचाईत झाली. पक्षाचा आदेश धुडकविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याकरिता काँग्रेसने भाजपबरोबर हातमिळवणी केली होती. या युतीमुळे काँग्रेसची नाचक्की झाली. स्थानिक आमदार गोपाळ अगरवाल यांच्याकडून खुलासा घेण्यात आला. विषय समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याच्या सूचना पक्षाचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश व चव्हाण यांनी आमदार अगरवाल यांना दिल्या होत्या. मतदानाच्या वेळी काही गडबड होऊ नये म्हणून पक्षाने माणिकराव ठाकरे यांना खास गोंदियामध्ये धाडले होते. पण काँग्रेसच्या स्थानिक नेते व जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपबरोबरच हातमिळवणी केली. पक्षाने आदेश देऊनही त्याचे पालन झालेले नाही ही बाब गंभीर आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.