उत्सवाचा जल्लोष साजरा करताना सामाजिक बांधिलकीचेही भान

समाजप्रबोधनाच्या हेतूने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान दरवर्षी दिसणारी सामाजिक बांधिलकी यंदाही मुंबईतील गणेश मंडळांनी दाखवली असून गणेशोत्सव काळात देणगीस्वरूपात जमा होणाऱ्या रकमेतून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. माफक दरात उपचार, शहरी-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, ग्रंथालयाची व्यवस्था, दुर्गम आदिवासी पाडय़ांवर पाठय़पुस्तकांसह शालेय साहित्याचे वाटप, सामाजिक विषयांवर जनजागृतीसाठी पथनाटय़े असे उपक्रम राबवत मंडळांनी समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे.

Maharashtra, ST Staff Congress, Practice Camp, Employee Promotion Exam, msrtc, ST Corporation,
एसटी महामंडळात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा….
expensive mandap in pm modi rally in yavatmal
मोदींच्या कार्यक्रमासाठी १३ कोटींचा सभामंडप! निविदा प्रक्रिया न राबविताच कामाला मंजुरी
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली

‘लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळा’तर्फे अनेक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. ‘लालबागचा राजा प्रबोधिनी उपक्रमां’तर्गत साने गुरुजी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत गरजू विद्यार्थी मोफत अभ्यास करू शकतात. स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय आणि संत ज्ञानेश्वर संदर्भ ग्रंथसंग्रहालय मंडळाने सुरू केले आहे. येथे आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरवली जातात. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि इंग्रजी संभाषण वर्गही चालवले जातात.  सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांना रुग्ण साहाय्य निधीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य केले जाते. लालबाग येथील चिवडा गल्लीतील औद्योगिक वसाहतीत मंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांवर केवळ शंभर रुपयांत उपचार केले जातात. गृहिणींसाठी मोफत योगवर्गही चालवले जातात.

चिंचपोकळीचा ‘चिंतामणी गणेशोत्सव मंडळाने या वर्षी ‘ऊर्जा फाऊंडेशन’ या समाजसेवी संस्थेच्या मदतीने ज्ञानपेटी उपक्रम राबवला आहे. याअंतर्गत मुलांना वाचण्यायोग्य पुस्तके ज्ञानपेटीत ठेवण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले होते. भाविकांनी अर्पण केलेली  पुस्तके खेडय़ापाडय़ातील आदिवासी विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहे. तसेच या मंडळातर्फे आदिवासी पाडय़ात जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. स्थानिक नागरिकांसाठी मंडळाच्या वतीने आरोग्य दवाखाना चालवला जातो. इथे रुग्णांना माफक दरात उपचार पुरवले जातात.

गेल्या तीन वर्षांपासून ‘ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’तर्फे ताडदेवचा राजा गणपतीची स्थापना केली जाते. स्थापनेपासूनच या मंडळाने पालघर जिल्ह्य़ातील सरस्वती विद्यामंदिर शाळा दत्तक घेतली आहे. एकूण ७०० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. त्यातील जास्तीत जास्त गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश, बूट आणि इतर शालोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. यावर्षी शाळेपासून दूरच्या अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या इतर सोयीसुविधांवरही खर्च करण्यात येतो. ‘एसआरसीसी’ या बालचिकित्सा रुग्णालयाशी आणि अपोलो रुग्णालयाशी मंडळाचा करार झालेला आहे. त्यानुसार मंडळातर्फे पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांना २० ते ३० टक्के सूट देण्यात येते.

काळाचौकी येथील ‘अभ्युदयनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’कडे जमा झालेल्या रकमेतील ५० ते ६० हजार रुपये रक्कम जव्हार, मोखाडा, शहापूर, माथेरान इत्यादी भागातील आदिवासी मुलांच्या आरोग्यावर खर्च केली जाते. ४० डॉक्टरांच्या साहाय्याने मंडळाचे कार्यकर्ते खडोपाडी जाऊन वैद्यकीय तपासणी शिबिरे राबवतात. त्यात आढळणाऱ्या रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जातात. मंडळाची स्वतची रुग्णवाहिकाही आहे. याद्वारे गरीब कुटुंबातील रुग्णांना वेळेत रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची सोय केली जाते. यावर्षी मंडळ परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी इंधन बचत, महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियम इत्यादी विषयांवर पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले. राजारामवाडी व संलग्न परिसर सार्वजनिक गणोशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी १० अनाथ मुले आणि ५ अंध मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला जातो. तसेच २ कर्करोगग्रस्त रुग्णांनाही आर्थिक मदत केली जाते, तर विलेपार्लेचा राजा मंडळातर्फे विलेपार्ले परिसरातील दोन गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके धान्य दिले जाते.