News Flash

चांगल्या पावसाने कृषी क्षेत्राला आधार

सर्व क्षेत्रांमध्ये पीछेहाट होत असताना फक्त कृषी क्षेत्रात ११.७ टक्के  एवढी भरीव वाढ झाली.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसाने राज्यातील सुमारे ५० टक्क्यांच्या आसपास लोकसंख्या अवलंबून असलेल्या कृषी आणि कृषीवर आधारित क्षेत्राला चांगला फायदा झाला. सर्व क्षेत्रांमध्ये पीछेहाट होत असताना फक्त कृषी क्षेत्रात ११.७ टक्के  एवढी भरीव वाढ झाली.

राज्यात २०२०-२१ च्या खरीप हंगामामध्ये १५६ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी, तर रब्बी हंगामामध्ये डिसेंबरअखेर ५३.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. खरिपामध्ये तृणधान्ये (६० टक्के वाढ), कडधान्ये (१४ टक्के), तेलबिया (२८ टक्के), कापूस (३३ टक्के), ऊस (४० टक्के) उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ अपेक्षित आहे, तर रब्बीमध्ये तृणधान्ये व कडधान्ये यांच्या उत्पादनात अनुक्रमे एक टक्का व १२ टक्के वाढ अपेक्षित असून तेलबियांच्या उत्पादनात १८ टक्के घट अपेक्षित आहे. २०१९-२० मध्ये फलोत्पादन पिकांखालील क्षेत्र १९.२० लाख हेक्टर असून २७८.७५ लाख मे. टन उत्पादन अपेक्षित आहे. राज्यात २०२० मध्ये ३५५ तालुक्यांपैकी १३९ तालुक्यांमध्ये अतिरिक्त, १७३ तालुक्यांमध्ये सरासरी इतका, तर ४३ तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला. चांगल्या पावसानेच कृषी क्षेत्रात चांगली प्रगती झाली. टाळेबंदीमुळे अन्य सर्व क्षेत्रांमध्ये उणे प्रमाण असताना फक्त कृषी क्षेत्राने सरकारला हात दिला.

महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ ३१ लाख चार हजार शेतकऱ्यांनी जानेवारी २०२१ अखेरीपर्यंत घेतला आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १९ हजार ८४७ कोटी रुपये वितरित केले आहेत. राज्य शासनाने करोना टाळेबंदीच्या काळात कृषी व संलग्न क्षेत्रासाठी अनेक उपाययोजना केल्याने या क्षेत्राला आधार मिळाला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्याच्या तक्रारी होत्या व विरोधकांकडूनही टीका झाली होती. मात्र ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाल्याचे दिसून येत आहे.

४३ लाख २२ हजार कृषिपंप

राज्यात सध्या ४३ लाख २२ हजार कृषिपंप सुरू असून वीज आणि सौरपंपांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात २०१९-२० मध्ये ९६ हजार ३२७, तर २०२०-२१ मध्ये ५२ हजार ८७० कृषिपंपांचे विद्युतीकरण करण्यात आले. अटल सौर पंप योजनेत २०१५-१८ मध्ये ५६६२, २०१८-१९ मध्ये सात हजार, तर मुख्यमंत्री सौर पंप योजनेत २०२० अखेपर्यंत ६४ हजार ५९८ सौरपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.

विदर्भ, मराठवाडय़ात दुग्धोत्पादन वाढीचे प्रयत्न

राज्य शासनाने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि मदर डेअरी यांच्यातर्फे विदर्भ व मराठवाडय़ातील दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर आदी ११ जिल्ह्य़ांमधील ४,२६३ गावे दुग्ध उत्पादन वाढीसाठी निश्चित करण्यात आली आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या दारात कृत्रिम रेतन सेवा, वैरण विकास कार्यक्रम, दर्जेदार पशुखाद्य पुरवठा, लसीकरण आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहत. या योजनेअंतर्गत ऑक्टोबर २०२० पर्यंत ४५ कोटी ७२ लाख रुपये खर्च करण्यात आला. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने ग्रामस्थांकडून २५३.६१ लाख लिटर, तर दूध संकलन केंद्रांमधून २१०.८० लाख लिटर दूध संकलन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:11 am

Web Title: good rains support agriculture abn 97
Next Stories
1 सर्वच क्षेत्रांत निराशा
2 ‘करोना’विरोधात यंत्रणा तोकडी
3 वाहनमालकाचा मृतदेह आढळल्याने गूढ वाढले
Just Now!
X