‘लोकसत्ता’चे नवे प्रकाशन ‘वर्षवेध’ या वार्षिकीला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. गतवर्षीप्रमाणेच हा अंक यंदाही सर्वाना हवाहवासा वाटत असल्याचेच दिसत आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी, विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तसेच पत्रकारांसाठी ‘वर्षवेध’ उपयुक्त ठरणार आहे. ‘वर्षवेध’ प्रकाशनाचे हे दुसरे वर्ष. ‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी याचा प्रकाशन सोहळा पार पडला.  प्रकाशनादरम्यानच या अंकाच्या प्रतींची आगाऊ नोंदणी झाली होती. राज्यभरातून या अंकास उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे.
म्हणून उपयुक्त..
अनेक महत्त्वाच्या घटनांचे आपण एक वाचक म्हणून साक्षीदार असतो. पण जीवनाची गती आणि काळाचा ओघ यांच्या प्रवाहात ही साक्ष स्मरणातून हरवत जाते. त्यामुळेच सरलेल्या वर्षांतील महत्त्वाच्या घटना कुठच्या हा प्रश्न विचारला की आपल्याला त्या घटना चटकन आठवत नाहीत. त्यामुळेच ‘नालंदा विद्यापीठ तब्बल ८२१ वर्षांनी पुन्हा कार्यान्वित झाले’, ‘सर्वोच्च न्यायालयाने दत्तक घेणे हा कोणत्याही धर्माच्या निरपेक्ष नागरिकाचा अधिकार असल्याचे मान्य केले’, ‘१४ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन दिनी, तारविरहित पेसमेकरचे यशस्वी रोपण करण्यात आले’, ‘जुळ्या मुलांपैकी एकाचे पालकत्व स्वीकारण्यास नकार दिला तर काय’, ‘भारत-चीन आणि पाकिस्तान या तीन देशांनी संयुक्त लष्करी कसरती केल्या’ या आणि अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी आपल्या विस्मृतीत जातात. वर्षवेध हा अशा वैविध्यपूर्ण घटनांना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
वर्षवेध २०१४ ची वैशिष्टय़े
*आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य घडामोडींच्या नोंदी
*सर्वोच्च न्यायालयाने घेतलेले वर्षभरातील महत्त्वाचे निर्णय -न्यायिक वर्षवेध
*नोबेल, भारतरत्न ते पं. हृदयनाथ मंगेशकर पुरस्कारांचा -पुरस्कार वर्षवेध
*बॅडमिंटन, एफ वन, सायकलिंग, फुटबॉल, क्रिकेट, टेनिस आदी खेळांचा -क्रीडा वर्षवेध
*देशभरातील महत्त्वाच्या नेमणुका अधोरेखित करणारा -नियुक्त्यांचा वर्षवेध
*सन २०१५ मधील विविध महत्त्वाच्या घडामोडींचे वेळापत्रक
*या वर्षांवर ठसा उमटवणाऱ्या सहा प्रमुख घटनांच्या विशेष नोंदी
*संरक्षण क्षेत्रातील आपली देदीप्यमान कामगिरी सांगणारे पान
*महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिन