वर्षभरात २०४ पुस्तके प्रकाशित; शहरी भागातही मागणी
वर्षांनुवष्रे आत्मचरित्र, कथा-कादंबऱ्या, पाककला, ज्योतिषशास्त्र, प्रवास वर्णन, संत साहित्य या विषयांवरील पुस्तकांना मराठी वाचकांकडून नेहमीच पसंती दिली गेली आहे. आता याच जोडीला शेतीविषयक पुस्तके सर्वसामान्य वाचकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरत आहेत. गेल्या वर्षभरात आत्मचरित्रांच्या खालोखाल शेतीविषयक तब्बल २०४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या विक्रीचा झपाटाही वाढत आहे.
गेल्या जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत विविध प्रकाशकांची शेतीविषयक २०४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यात शेतीतील अर्थशास्त्र, उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्यदायी भाजीपाला, दूध उत्पादनातील व्यवस्थापन, औषधी वनस्पतींची लागवड, आधुनिक कुक्कुटपालन या विषयांतील पुस्तकांना सर्वाधिक मागणी आहे. मागील वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहे. राज्यातील रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे, धुळे आदी जिल्ह्य़ांतील ग्रामीण भागांप्रमाणे शहरी भागांतही शेतीविषयक पुस्तकांना मागणी वाढत आहे, हे विशेष.
महाराष्ट्रात शेतीविषयी पुस्तकाच्या लिखाणाचा ओढा वाढणे ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. गेल्या २० वर्षांत शेतीविषयी प्रश्नाच्या जाणिवा वाढल्या आहेत.
केवळ ग्रामीण भागापुरती मागणी नाही
शेतीविषयक पुस्तके आणि मासिकांना मागणी आहे. सध्या शेती हा विषय केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित नाही. गेल्या काही वर्षांत शेती विषयावरील पुस्तकांचा अभ्यास झपाटय़ाने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात दूध उत्पादन, कुक्कुटपालन आणि औषधी वनस्पतींची लागवड या विषयांतील पुस्तके सर्वाधिक खरेदी केली जात आहेत.
– प्रीती काटोले, संपादक, गोडवा शेती मासिक

शेतीचे अर्थशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान
राज्यभरात विविध प्रकाशकांची एकाच वर्षांत २०४ पुस्तके आली आहेत. यात शेती विषयातील अर्थशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावरील पुस्तकांची अधिक विक्री होत आहे. यंदा हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहे. केवळ ग्रामीण भागांतच नव्हे तर शहरी भागांतही या पुस्तकांना मागणी आहे.
– मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुकगंगा