रात्रभर मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शहरात अनेक भागात पाणी साचले होते. मात्र, रात्रभर मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने चांगले काम केले आहे. महापालिकेकडून मुंबईकरांना वेळोवेळी मदतही पुरवण्यात आली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक केले आहे. मात्र, असे असले तरी दुसरीकडे मुंबईकरांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.


मुंबई महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मुंबईच्या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, काल रात्रभर मुंबईत अतिवृष्टी झाली. त्यामुळेच मालाड येथे भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला असून ३०-४० लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनास्थळाला मी भेट दिली आहे.

दरम्यान, वेस्टर्न लाईनवरील लोकल गाड्या सुरु झाल्या असल्या तरी मध्य रेल्वे मार्गावरील अद्याप सुरु झालेल्या नाहीत कारण या मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. येथील पाणी पंपांद्वारे बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर आम्ही काल रात्रीच आज शाळा आणि महाविद्यालयांना आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर केली. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातील लोक अॅलर्ट राहत लोकांना मदत करीत होते. मात्र, आता शहरातील वाहतुकही नियंत्रणात आली आहे.


दरम्यान, रात्रभर मुंबई पोलिसांना सुमारे १६००-१७०० ट्विट्सद्वारे मुंबईकरांनी तातडीची मदत मागितली. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागानेही रात्रभर झटून लोकांना मदत केली. त्यानंतर आता पुढील दोन दिवसही मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत.