कुर्ला, मालाडमध्ये गंडा; संकेतस्थळांवरील माहितीत गुन्हेगारांकडून बदल

जयेश शिरसाट, मुंबई</strong>

सुरक्षेसाठी आवश्यक काळजी न घेता ‘गुगल’ची मोफत सेवा बिनदिक्कत वापरणाऱ्या व्यावसायिकांमुळे सर्वसामान्य ग्राहक ‘सायबर भामटय़ां’चे लक्ष्य ठरत आहेत. अशा स्वरूपाचे दोन गुन्हे नुकतेच कुर्ला आणि मालाडमध्ये घडले. संकेतस्थळावरील माहितीत फेरफार करून केल्या जाणाऱ्या आर्थिक गुन्ह्य़ांना ‘गुगल’ जबाबदार आहेच. परंतु, सर्च इंजिनची मोफत सेवा वापरून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या आस्थापनांनी सतर्क राहाणे आवश्यक आहे, असे सायबरतज्ज्ञांचे मत आहे.

कुल्र्यातील काजल जैन यांनी डिसेंबरमध्ये ‘क्लब फॅक्टरी’च्या संकेतस्थळावरून २४३ रुपयांचा नाइट गाऊन विकत घेतला. त्यानंतर आठवडय़ाने क्लब फॅक्टरीने तो नाइट गाऊन उपलब्ध नसल्याचे लघुसंदेशाद्वारे कळवले. पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी गुगलवरून क्बल फॅक्टरीचा ग्राहक सेवा क्रमांक घेतला. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता कार्ड तपशील आवश्यक आहेत, असे त्यांना सांगण्यात आले. तपशील देताच जैन यांच्या खात्यावरून पाच हजार रुपये काढण्यात आले. पुढील व्यवहार होण्याआधी जैन यांनी ते कार्ड ‘ब्लॉक’ केले.

मालाडला राहणारे विजय मारवा (७४) यांना घरात साफसफाई करताना सात हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटा सापडल्या. त्या आता वठतील का हे विचारण्यासाठी त्यांनी गुगलवरून बँकेचा संपर्क क्रमांक मिळवला. संपर्क केला असता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली मारवा यांचे कार्ड तपशील घेऊन त्यांच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढण्यात आले.

गुगलवर व्यक्ती, समूहाची माहिती उपलब्ध असते, मात्र त्याची खातरजमा गुगल करत नाही. आपल्या उद्योग-व्यवसायाची माहिती ग्राहकांना सहज मिळावी, व्यवसाय वाढावा, म्हणून जागा (स्पेस) मिळवली जाते. ती देताना गुगलकडून संबंधित व्यावसायिकाला त्याने नमूद केलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे सांकेतांक पाठवला जातो. या सांकेतांकाद्वारे व्यावसायिक संकेतस्थळावरील जागा वापरता येते, मात्र दिलेल्या माहितीच्या पडताळणीची व्यवस्था गुगलकडे नाही.गुगलवरील माहितीत अचूकता यावी या उद्देशाने ‘सजेस्ट अँड एडिट’चा पर्याय देण्यात आला आहे. त्याआधारे पत्ता, संपर्क क्रमांक, नकाशा यात फेरफार करणे सहज शक्य आहे. बदलण्यात आलेल्या माहितीचीही पडताळणी गुगलकडून होत नाही. नेमक्या याच तांत्रिक पोकळीचा फायदा भामटे घेत आहेत. गुगलवरील बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, विविध सेवा पुरवठादार, ऑनलाइन वस्तू विकणाऱ्या कंपन्या, बिल भरणा केंद्रांच्या मूळ संपर्क क्रमांकांऐवजी भामटे स्वत:चे मोबाइल क्रमांक देतात. त्यामुळे गुगलवरून ग्राहकांना बँकांऐवजी भामटय़ांचा संपर्क क्रमांक मिळतो. त्यावर फोन केल्यावर भामटे ग्राहकांना बोलण्यात गुंतवून, कार्ड तपशील घेतात आणि परस्पर त्याच्या खात्यातील रक्कम काढतात. गेल्या काही दिवसांत मुंबईसह देशाच्या प्रमुख शहरांमध्ये अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

अशा गुह्य़ांमध्ये गुगलला आणि संबंधित आस्थापनेला जबाबदार धरणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीला कार्ड तपशील, ओटीपी क्रमांक देणे धोक्याचे असल्याबाबत जनजागृती आवश्यक आहे. मात्र तंत्रज्ञान झपाटय़ाने बदलते आहे. संकेतस्थळावर जागा मागणाऱ्या प्रत्येकाच्या माहितीची, त्यातील फेरफारांची काटेकोर तपासणी गुगलकडून होणे आवश्यक आहे, असे मत सायबरतज्ज्ञ रितेश भाटिया यांनी व्यक्त केले. आस्थापनांनी पोलिसांप्रमाणे ग्राहक सेवा केंद्र वा तक्रार निवारण केंद्रांसाठी विशेष संपर्क क्रमांक निवडावेत. जे तीन किंवा चार आकडी असतील, असे मत भाटिया यांनी मांडले. सायबर महाराष्ट्रने गुगलशी पत्रव्यवहार करून आर्थिक फसवणुकीबाबत कळवले होते. तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

‘एनी डेस्क’चा वापर

कुर्ला येथील काजल जैन यांना गंडा घालण्यासाठी भामटय़ाने ‘एनी डेस्क’ या अ‍ॅपचा वापर केला. एनी डेस्कच्या माध्यमातून दूरवरील संगणक, मोबाइल परस्पर हाताळता येतो. याच माध्यमातून काही दिवसांपूर्वी हवाई दलातील अधिकाऱ्याला भामटय़ांनी ५० हजार रुपयांचा गंडा घातला होता.

आस्थापनांनी ग्राहक सुरक्षेसाठी संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या माहितीवर सतत लक्ष ठेवावे. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करावे. या माहितीत जराही बदल आढळल्यास ती रोखावी. त्यासाठी गुगलसह संबंधित माध्यमांशी संवाद साधायला हवा.

– अ‍ॅड. प्रशांत माळी, सायबरतज्ज्ञ