‘गुगल’वरून पर्यटनस्थळांचा शोध महागातदमणमधील नागरिकाला १६ हजारांचा गंडा; मोबाइल क्रमांकांची पडताळणी होत नसल्याने फसवणूक

गुगल या अग्रगण्य सर्च इंजिनचा दुरुपयोग करून गंडा घालणाऱ्या ऑनलाइन भामटय़ांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबई, महाराष्ट्रासह देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांची माहिती ‘गुगल’द्वारे जाणून घेणाऱ्या पर्यटकांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अशा फसवणुकीबाबत सायबर महाराष्ट्रसह अन्य तपास यंत्रणांनी केलेल्या सूचनांना ‘गुगल’ने केराची टोपली दाखवल्याने भामटय़ांचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नागरिकांचा पर्यटनाकडे वाढलेला कल, बसल्याजागी पर्यटनस्थळांची संकेतस्थळावर माहिती मिळवण्याची, ऑनलाइन शुल्क भरून आरक्षण करण्याची सुविधा लक्षात घेऊन चोरांनी लक्ष पर्यटकांकडे वळविले आहे. जास्तीतजास्त पर्यटक गळाला लागावेत यासाठी भामटय़ांनी दिवाळीची सुटी सुरू होण्याआधीच गुगलचा दुरुपयोग करून जाळे विणले आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

गुगल सर्च इंजिनचा वापर करून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची माहिती मिळवणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. परिमंडळ वन अधिकारी मनोज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिवाळीच्या सुटीत (२१ ऑक्टोबर) दमणहून मुंबईत पर्यटनासाठी येऊ पाहणाऱ्या शैलेंद्र मिश्रा यांनी गुगल सर्च इंजिनचा वापर करून राष्ट्रीय उद्यानाची माहिती घेतली. तेव्हा अधिकृत संकेतस्थळासोबत संपर्कासाठी एक भ्रमणध्वनी क्रमांक मिश्रा यांना आढळला. त्यावर संपर्क केला असता समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने १० रुपये प्रवेश शुल्क ऑनलाइन भरण्यास सांगितले. या व्यवहारासाठी मिश्रा यांचे कार्ड तपशील घेण्यात आले आणि त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १६ हजार रुपये काढण्यात आले. त्यांच्यासारखाच अनुभव मुंबईबाहेरील जडेजा कुटुंबाला आला. अन्य कुणाची फसवणूक होऊ  नये म्हणून या दोघांनी उद्यानाला हा प्रसंग कळवला.

त्यानंतर उद्यानाच्या परिमंडळ वन अधिकाऱ्याने गुगलवर पाहणी केली असता उद्यानाच्या नावासोबत अनोळखी भ्रमणध्वनी क्रमांक आढळला. त्यावरून मिश्रा, जाडेजा कुटुंबाने दिलेल्या माहितीची खातरजमा झाली. वन अधिकाऱ्यांनी गुगलशी पत्रव्यवहार करून संबंधित क्रमांक भामटय़ांचा असून त्याद्वारे फसवणूक सुरू असल्याची कल्पना दिली. तसेच हा क्रमांक काढून टाकण्याची विनंती केली.

तरीही हा भ्रमणध्वनी क्रमांक अनेक दिवस कायम राहिल्याने गुगलद्वारे उद्यानाची माहिती घेणाऱ्या अन्य पर्यटकांचीही फसवणूक करण्यात आली. फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने पुढे येऊ  लागल्याने वन अधिकाऱ्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.

अलीकडच्या घटना

मलबार हिल येथील उच्चभ्रू वस्तीतील दारू घरपोच मागावणाऱ्या दोन ग्राहकांना एकूण अडीच लाख रुपयांचा गंडा पडला. दोन्ही तक्रारदारांनी गुगलच्या मदतीने नामांकित दारू विक्रेत्या दुकानांचे संपर्क क्रमांक शोधले होते. प्रत्यक्षात ते दुकानांचे नसून भामटय़ांचे होते. २० आणि २१ नोव्हेंबरला मलबार हिल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले.

गेल्या आठवडय़ात भारतीय सुरक्षा यंत्रणेतील शास्त्रज्ञाने गुगलद्वारे सामानाची ने-आण करणाऱ्या (मूव्हर्स अँड पॅकर्स) कंपनीचा क्रमांक मिळवून व्यवहार ठरवला. हा क्रमांकही भामटय़ांचा होता. ६० हजार रोख रक्कम स्वीकारून भामटे पसार झाले. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

सूचनांचा परिणाम नाही

अशा प्रकारे फसवणूक सुरू झाल्याचे लक्षात येताच सायबर महाराष्ट्रसह अन्य राज्यांतील सायबर पोलिसांनी गुगलला ‘एडिट अँड सजेस्ट’ या पर्यायाचा दुरुपयोग होऊ  नये या दृष्टीने उपाय करण्याची सूचना केली आहे. सायबर महाराष्ट्रने गुगलला याविषयी स्मरणपत्रेही पाठवली आहेत. मात्र गुगल या सूचनांबाबत गंभीर नाही, असे निरीक्षण एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नोंदवले. गुगलच्या भारतातील प्रतिनिधी, प्रवक्त्याशी संपर्क होऊ  शकला नाही.

दुरुपयोग असा

वापरकर्त्यांना अधिकाधिक, अचूक माहिती वा तपशील मिळावेत, यासाठी गुगलने ‘एडिट अँड सजेस्ट’ हा पर्याय उपयोगात आणला. त्या आधारे गुगलच्या व्यासपीठावरून एखादा सेवा पुरवठादार स्वत:चे नेमके तपशील देऊ  शकतो वा त्यात बदल करू शकतो. तसेच सर्वसामान्य वापरकर्तेही नेमकी माहिती जोडू शकतात. याच पर्यायाद्वारे चोर स्वत:चा भ्रमणध्वनी सेवा पुरवठादार कंपनीसोबत जोडतात. वापरकर्ते जेव्हा माहिती शोधतात तेव्हा त्यांच्या हाती अन्य क्रमांकासोबत चोरांचा क्रमांकही येतो.