संपूर्ण भारतभरात ब्रॉडबॅण्ड अ‍ॅक्सेस, उपयुक्त व्यवहारांसाठी इंटरनेटचा व्यावसायिक वापर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेटच्या सर्व व्यवहारांमध्ये भारतीय भाषांचा मोठय़ा प्रमाणावर होऊ शकणारा वापर अशी तीन प्रमुख उद्दिष्टे गुगल इंडियाने आता आपल्या नजरेसमोर ठेवली आहेत. यात भारतीय भाषांच्या वापराला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. कारण हा वापर वाढल्यास इंटरनेटच्या भारतातील वापरामध्ये प्रचंड मोठी वाढ अपेक्षित आहे, असे प्रतिपादन गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.
गरज का?
गुगल इंडियाने आता भारतावर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे भारतीयांच्या सवयी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलीकडेच भारतीय महिलांच्या इंटरनेट वापरासंदर्भातील एक महत्त्वाचा सर्वेक्षण अहवाल गुगलने जारी केला. गुगलच्या या भारतकेंद्री धोरणाबाबत विचारता राजन आनंदन म्हणाले की, २०१५ मध्ये जगातील सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते हे भारतीय असतील. त्या दिशेने सध्या भारताचा प्रवास सुरू आहे. भारतात लाखोंच्या संख्येने असे भारतीय आहेत की, त्यांनी संगणकच वापरलेला नाही; मात्र ते आता मोबाइल किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. आजही अनेक खेडय़ांमध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध नाही. मात्र मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचले आहे. यातही एक बडा वर्ग असा आहे की, त्यांना भारतातील ३२ पैकी कोणती ना कोणती प्रमुख भाषा लिहिता, वाचता येते, पण इंग्रजी येत नाही. या सर्वासाठी इंटरनेट आणि संगणकीय व्यवहार भारतीय भाषांमधून होणे गरजेचे आहे.
होणार काय?
सध्या अनेक भारतीय भाषांमध्ये टंकलेखनासाठी विविध सॉफ्टवेअर्स आहेत. मात्र त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही, असे सांगून आनंदन पुढे म्हणाले की, त्यामुळे खूपच गोंधळाची स्थिती आहे. त्यावर आता युनिकोडचा उतारा आहे. पण त्यामध्येही एक सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. गुगलसारखा मोठा अवाढव्य पसारा आणि प्रभाव असलेली कंपनीच हे काम प्रभावशाली पद्धतीने करू शकते. म्हणूनच आता संगणक  आणि मोबाइल किंवा स्मार्टफोनवरून भारतीय भाषांमध्ये केल्या जाणाऱ्या टंकलेखनात सुसूत्रता आणण्यासाठी गुगलमध्ये मोठय़ा प्रमाणावर काम सुरू आहे. येत्या काही वर्षांत ते वापरण्याच्या स्थितीत आल्यानंतर इंटरनेटच्या व्यवहारांमध्ये खूप वाढ झालेली भारतात पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.
मराठी प्रोमोजसाठी मराठीतून जाहिराती!
भारतीय भाषांचा वापर हा काही केवळ टंकलेखनापुरता मर्यादित नाही, तर आता यूटय़ूबसारख्या माध्यमांमध्येही तो प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजन आनंदन यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारतीय भाषांमधील प्रोमोज किंवा व्हिडीओमध्ये त्याच भाषेतून असलेल्या जाहिराती आता महिन्याभरात पाहायला मिळतील. म्हणजे मराठीतून असलेले व्हिडीओ किंवा चित्रपट अथवा मालिकांच्या प्रोमोजच्या सुरुवातीस मराठी जाहिराती असतील!