वयस्कर सामाजिक कार्यकर्त्यांला मारहाण करणारे पोलीस कुख्यात गुंडांसमोर कसे निमूट होतात, याचे वास्तवदर्शन रविवारी ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले. मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त असतानाही खून, दरोडय़ासारख्या गुन्ह्य़ांची नोंद असलेले गुंड आपल्या टोळक्यांना सोबत घेऊन कोपरी परिसरात दहशत निर्माण करत फिरत होते. गुंडांच्या भीतीने येथील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने संपूर्ण परिसराला बंदचे स्वरूप आले होते, तर दुपारनंतर दोन गटांत हाणामारी झाल्यामुळे हा तणाव आणखी वाढला होता.
 ठाणे महापालिकेच्या मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ५७ (ब) आणि कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ (अ) या दोन प्रभागांमध्ये पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. एकेकाळी दहशतीचे केंद्र म्हणून बदनाम असलेल्या मुंब्रा परिसरात पोटनिवडणूक शांततेत पार पडली. कोपरी परिसरात मात्र नेमके उलटे चित्र दिसत होते. या प्रभागाची पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या दफ्तरी एखाददुसऱ्या हाणामारीची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात या परिसरात दिवसभर गुंडांची जबर दहशत होती. ठाणे तसेच नवी मुंबई परिसरात खुनासारखे अनेक गंभीर गुन्ह्य़ांचा आरोप असलेला अन्नू आंग्रे या प्रभागात आपल्या २०-२५ जणांच्या टोळक्यासह येथे बिनधास्त फिरत होता. ठाण्यातील एका बडय़ा काँग्रेस नेत्याचा राजाश्रय लाभलेल्या आंग्रेसोबत काँग्रेसचा विटावा परिसरातील नगरसेवक आणि खुनासारख्या प्रकरणातील संशयित आरोपी राजा गवारी हासुद्धा येथे हजर होता.

पोलिसांच्या देखत गुंड बिनधास्त फिरत असल्याने दहशतीमुळे दुपारी उशिरापर्यंत मतदार मतदान केंद्रांवर फिरकलेच नाहीत. या दहशतीमुळे येथील दुकानदारांनी दुकाने बंद करणेच पसंत केले.