महाराष्ट्रातील लोकनेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघातील निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. मुंडे यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आणि महाराष्ट्राने लढवय्या लोकनेता गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या..

गोपीनाथ मुंडेंचे अकाली निधन हा मोठा धक्का आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो. विरोधी पक्षाचे नेतृत्व त्यांनी अतिशय प्रभावीपणे केले. यंदाच्या वर्षी त्यांना देशाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली याचे समाधान होते. शेतीच्या प्रश्नांची जाण त्यांना होती. देशाच्या त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. महाराष्ट्राने आज सर्वात मोठा लोकनेता गमावला. मुंडेंच्या जाण्याने भरपूर दु:खी झालोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि व्यक्तीश:ही मुंडे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी
– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन दु:ख दायक आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. झालेल्या घटनेचा शोक व्यक्त करतो.
– राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

मुंडे साहेबांचे निधन झाले यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानी आहे. बीडहून शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते त्यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी आम्ही एकत्रितरित्या काम करत होतो
– प्रकाश जावडेकर

अजूनही विश्वास बसत नाही मुंडे आपल्यात नाहीत. सर्वसामान्य कुटुंबातून उभा राहिलेला नेता हरपला. राज्याचे आणि देशाचे मोठ्याप्रमाणात नुकसान, गेल्या २०-२५ वर्षांपासून आमची मैत्री होती. मैत्रीला जागणारा, शब्दाला जागणारा नेता गमावला. कालच त्यांचा फोन आला होता. हा विभाग मिळाला आहे विकासाची काही कामे रखडली असतील तर सांगा
– हर्षवर्धन पाटील, काँग्रेस नेते

ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री श्री. गोपीनाथजी मुंडे यांचे अपघाती निधन हे अतिशय धक्कादायक आणि चटका लावुन जाणारे आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. अथक संघर्ष करुन त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजकारणाच्याही पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते. अतिशय विनम्र स्वभाव हा त्यांचा गुण सर्वांनीच घेण्यासारखा आहे. त्यांच्या निधनाने केवळ मराठवाड्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नुकसान झाले आहे. आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार या पदांच्या माध्यमातुन त्यांनी महाराष्ट्राच्या हिताची अनेक कामे केली. केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसात मृत्युने त्यांना अशा भयानक आणि निर्दयी प्रकारे गाठावं, हे अतिशय क्लेशकारक आहे.
– पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

विकासाचा दृष्टिकोन असेलेले लोकनेते म्हणून श्री. मुंडे साहेब केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात परिचित होते. त्यांना प्रचंड जनाधार होता. ग्रामीण जनतेसह समाजाच्या विविध प्रश्नांची त्यांना बारकाईने जाण होती. त्यामुळेच त्यांच्यावर आता केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. एक मोठी संधी मिळालेली असताना असा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याने तीव्र वेदना होत आहेत. आपल्यासाठी आजची सकाळ दुर्दैवी ठरली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा बुलंद आवाज लुप्त झाला आहे. राज्याच्या हितासाठी नेहमीच त्यांनी सर्वांनाबरोबर घेऊन काम करण्याची भूमिका बजावली. म्हणूनच त्यांना जनमाणसांत प्रचंड लोकप्रियता लाभली होती. एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन जनसेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. त्यांच्या आत्म्यास सद्‌गती लाभो
अजित पवार, उपमुख्यमंत्री

लोकनेते मुंडे कालवश झाल्याचे कळले अतिशय दु:ख झाले. मनमिळावू नेता महाराष्ट्राने गमावला. आमच्यात नेहमी शेतकऱयांच्या विकासासाठी कसे काम करता येईल यावर चर्चा होत असत. गेली अनेक वर्षे खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही काम करत होतो. सत्तेत असताना सभागृहात ते माझ्यावर  विविध प्रश्नांवरुन हल्ले करत असत परंतु, सभागृहाबाहेर अगदी खेळीमेळीने आमच्यात चर्चा होत असे. महाराष्ट्रात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही.
– सुशीलकुमार शिंदे

काल संध्याकाळी माझ्या सोबत मुंडेजी शेतकऱयांच्या प्रश्नांवर बोलत होते आणि आज सकाळी ऐकलेल्या धक्कादायक बातमीवर विश्वासच बसत नाही
– रामविलास पासवान

परळीसारख्या दुर्गम भागातून पुढे आलेल्या या नेत्याभोवती दिल्लीमध्ये सातत्याने गर्दी पहायला मिळायची असे लोकप्रिय नेते गमावल्याने महाराष्ट्र पोरका झाला. मुंडे कधीही भाषणात आडपडद्याने बोलत नसत थेट वार करुन ते नेतृत्व करत होते. बाळासाहेबानंतर शरद पवारांवर थेट हल्लेकरणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचेच नाव होते. गोपीनाथ मुंडेंची महायुतीला इतकी सवय झाली होती त्यांच्याशिवाय महायुतीचे पान हलत नव्हते. हे खरे आहे. जेव्हा-जेव्हा सामनातील लिखाणातून इतर भाजप नेत्यांनी टीका केली त्यावेळी गोपीनाथ मुंडे प्रत्येकवेळी फोन करुन माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहीले आहेत आणि ‘सामना’केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून शिवसेना-भाजपच्या विचारांना महाराष्ट्रात पोहोचविण्याचे काम सामना करत असल्याचे त्यांचे मत होते
– संजय राऊत, शिवसेना नेते

महाराष्ट्राच्या आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट अशी बातमी आहे. असे होईल असे अपेक्षीत नव्हते. बीड जिल्ह्याने खंदा नेता गमावला आहे. ते स्वत: संघर्ष करुन आमदार झाले होते. आम्ही आमदार होण्यामध्येही त्यांचा वाटा आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती हे भाग्य आहे. राजकारणाच्या बाहेर त्यांनी वेळोवेळी मैत्री जपली. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सामील आहे.
– सुरेश धस, राष्ट्रवादीचे नेते

गोपीनाथ मुंडेंकडे दिलखुलासपणा होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला ते आपलेसे वाटायचे. मी उमेदवारी अर्ज भरताना त्यांना फोन केला होता तेव्हा त्यांनी उत्साहाने मी तेथे येतोय असे म्हटले आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना ते माझ्यासोबत उपस्थित होते. त्यावेळी मी त्यांना तुम्ही आज मी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहीलात परंतु, शेतकऱयांच्या प्रश्नांसाठीचा माझा लढा कायम राहील. भविष्यात तुमच्या कारखान्याविरोधात लढायची वेळ आल्यास मी तुमच्याविरोधात असेन असे म्हटले असता, मुंडे यांनी तशी वेळच येणार नाही. आता आपल्याला देश पातळीवर शेतकऱयांचे धोरण ठरवायचे आहे. मिळून काम करु असा विश्वास दिला होता. महाराष्ट्राने आज खरोखरोच मोठा लोकनेता गमावला आहे.
– राजू शेट्टी

राजकारणापेक्षा वैयक्तिकरित्या मी त्यांना चांगला ओळखत होतो. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे नेहमी त्यांच्याशी भेट होत असे. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. महाराष्ट्राने आज मोठा नेता गमावलाय.
– रितेश देशमुख, अभिनेता