रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची शिफारस करून ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी प्रकाश जावडेकर यांना ‘कात्रज घाट’ दाखविल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांला संधी देण्यापेक्षा ‘राजकीय मित्र’ असलेल्या आठवले यांची अधिक उपयुक्तता असल्याने मुंडे यांनी त्यांच्या पारडय़ात आपले वजन टाकले. जावडेकर हे राज्यसभेच्याच उमेदवारीसाठी आग्रही असून त्यांना छत्तीसगढ, गुजरात किंवा राजस्थान या राज्यांमधील रिक्त जागांमधून राज्यसभेवर पाठविण्याचा विचार केंद्रीय नेतृत्वाला करावा लागणार आहे.
जावडेकर यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या वेळी रेखा महाजन यांच्या नावाचा विचार सुरू होता. तेव्हा मुंडे यांनीच जावडेकर यांचे नाव सुचविले होते व त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. मात्र यावेळी रामदास आठवले यांचा राज्यसभेचा हट्ट पुरविणे हे पक्षासाठी महत्वाचे ठरले आहे. आठवले यांना अन्य राज्यांमधून राज्यसभेवर पाठविण्याचा विचार सुरू असल्याचे भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह काही नेत्यांनी जाहीरपणेही सांगितले होते. आठवले यांनी अध्यक्ष राजनाथसिंह यांची भेटही घेतली होती. त्यामुळे जावडेकर यांची महाराष्ट्रातून उमेदवारी निश्चित मानली जात होती आणि आठवले यांना अन्य राज्यांमधील एका जागेवरून राज्यसभेवर पाठविले जाईल, अशी अटकळ होती.
मात्र ते न करता आठवले यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्याचा निर्णय आठवले यांच्यामुळे होणारा ‘राजकीय लाभ’ लक्षात घेऊन घेतला गेला आहे. आठवले यांना खासदारकी देणे आता अधिक ताणले, तर त्यांची नाराजी वाढेल. आगामी लोकसभा निवडणुकीत आठवले यांचा महायुतीला चांगला उपयोग होऊ शकतो. जावडेकर पक्षाचे जुने नेते आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्तेपदासारखे महत्वाचे पद आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याचा त्यांचा पिंड नाही. जावडेकर यांना अन्य राज्यांमधून राज्यसभेवर पाठविणे तेथील इच्छुकांच्या स्पर्धेमुळे शक्य झाले नाही, तरी पक्षहित लक्षात घेऊन ते शांतच राहतील. केंद्रात सत्ता मिळाल्यास त्यांना महत्वाचे पद देऊन त्यांची नाराजी दूर करता येईल, असा विचार ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे.
राज्यसभा उमेदवारीबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची नवी दिल्लीत शुक्रवारी बैठक झाली. निर्णय केंद्रीय नेतृत्वानेच घ्यावा असा ठराव राज्यात करण्यात आला. त्यामुळे अजून अंतिम निर्णय व्हायचा आहे.