उत्तरप्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रावर भाजपची मोठी भिस्त आहे. त्यातूनच आगामी  निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना-रिपब्लिकन महायुतीला ३३ जागांवर विजय मिळेल, असा ठाम दावा विश्वास ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. मुंडे यांच्या भाषणानंतर राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी महाराष्ट्रातून ४८ पैकी ४६ जागांवर विजय मिळालाच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून मुंडे, फडणवीस, आदी नेतेमंडळींची चांगलीच पंचाईत केली. निवडणुकीच्या रणमैदानात जेथे ३३ जागा मिळवितानाही दमछाक होणार आहे आणि विजयाची शाश्वती नाही, तेथे ४६ जागांवर विजय कसा मिळणार, असा प्रश्न नेत्यांना व कार्यकर्त्यांना पडला.
अखेर गर्दीचे गणित जमले
मोदींच्या सभेला किती गर्दी जमणार, हा विषय गेले काही दिवस चर्चिला जात होता. भाजप नेत्यांनी जंग जंग पछाडून गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न केले. सोशल मीडीया, करोडो एसएमएस, ई-मेल याद्वारे निमंत्रणे दिली. हजारो बस व खासगी वाहने, २२ विशेष रेल्वेगाडय़ा यातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. भाजपने स्वबळावर ही सभा घेतल्याने गर्दीचे गणित यशस्वी होईल की नाही, अशी शंका घेतली जात होती. पण दोन लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या गर्दीने वांद्रे-कुर्ला संकुलाचे भव्य मैदान व परिसर फुलून गेला आणि भाजप नेत्यांचा उत्साह दुणावला. शहराच्या भरवस्तीत असलेल्या दादर येथील शिवाजी पार्क मैदान हे राजकीय पक्षांच्या विक्रमी गर्दीसाठी प्रसिध्द असलेले मैदान. मात्र वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान त्यापेक्षा मोठे असून शहरापासून लांब आहे. तरीही भाजपने स्वबळावर गर्दीचे गणित जमविले.

भ्रष्टाचार खणून काढणार-राजनाथसिंह
आदर्श, सिंचन गैरव्यवहारासह महाराष्ट्रातील अनेक गैरव्यवहारांची प्रकरणी भाजपची सत्ता आल्यावर खणून काढली जातील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी केले. देशातही शेती, निर्मिती उद्योग व अन्य आघाडय़ांवर चांगली कामगिरी करून दाखवून रूपया मजबूत केला जाईल. महागाई काबूत ठेवून भ्रष्टाचाराला आळा घातला जाईल, असे त्यांनी नमूद केले.