दिवसा चहाचा धंदा करून रात्रीच्या अंधारात घरफोड्या करणाऱ्या दोघांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. दोघे नालासोपारा येथील राहणारे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांनी दोन गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघेही गोरेगावमध्ये चहाविक्रीचा व्यवसाय करीत होते.

अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींची नावे इब्राहिम चांद मोहम्मद लोहा आणि कल्पेश मोगनलाल पुरोहित अशी आहेत.  दोघांचा गोरेगाव येथे चहाचा धंदा असल्याने अनेक सोसायट्यांची त्यांना माहिती होती. हल्लीच त्यांनी नालासोपारा येथे चहा विक्रीचा धंदा सुरु केला होता. दिवसभर चहा विकल्यानंतर रात्री दोघे गोरेगावला येत असत आणि घरफोडी करून नालासोपाऱ्याला निघून जात. त्यामुळे कोणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता.

मुंबईत आल्यानंतर दोघे स्टेशन जवळील सोसायटी टार्गेट करायचे. घरफोडीनंतर स्टेशनवरून पुन्हा नालासोपारा येथे परत येत असत आणि सकाळी पुन्हा चहाचा धंदा सुरु करत. गोरेगाव परिसरात घरफोडीचे प्रकार होऊ नयेत याकरिता पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. वरिष्ठ निरीक्षक संजीव भोळे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक अमित म्हात्रे, पोलीस हवालदार नरळे, कोंडे यांचे पथक रात्रीच्या वेळेस गस्त करत होते. तेव्हा गोरेगाव पश्चिमच्या गजानन कॉलनी जवळील परिसरात इब्राहिम आणि कल्पेश हे दोघे संशयास्पदपणे फिरताना आढळून आले. कसून चौकशी केल्यावर दोघांनी गोरेगाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. दोघांविरोधात व्ही.पी. रोड पोलीस ठाणे, अहमदाबाद आणि गुजरात शहर येथे घरफोडीचे गुन्हे गुन्हे दाखल आहेत. ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.