20 September 2019

News Flash

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील स्मारकाबाबत महाराष्ट्र शासन म्हणतं…

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथे वास्तव्य असलेल्या घराचे स्मारकामध्ये रुपांतर करण्यावर तेथील स्थानिक क्वीन काऊन्सिल या स्वराज्य संस्थेने आक्षेप घेतला आहे.

लंडन : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडनस्थित घर.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचे स्मारकामध्ये रुपांतर करण्यावर तेथील स्थानिक क्वीन काऊन्सिल या स्वराज्य संस्थेने आक्षेप घेतला आहे. यावर महाराष्ट्र शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. क्वीन काऊन्सिलच्या आक्षेपांचे निराकरण करून हे स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात लंडन शहरातील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथे वास्तव्यास होते. ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने विकत घेतली आहे. त्यांच्यामार्फतच या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. तथापि, तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने (Queen Council) या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्याबाबत आक्षेप घेतला आहे.

क्वीन काऊन्सिलने उपस्थित केलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने शासनाने स्पष्टीकरण देताना म्हटले की, महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी ही वास्तू विकत घेतली त्यावेळी ती अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिचे तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक होते. याबाबतची कार्यवाही महाराष्ट्र शासनाच्यावतीने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी केली असून हे काम निवासी म्हणून करण्यात आले आहे. दरम्यान, क्वीन काऊन्सिलकडे याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

क्वीन काऊन्सिल यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनुसार त्यांच्यासमोर महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी सिंघानिया अॅण्ड को. सॉलिसिटर्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात क्वीन काऊन्सिलपुढे महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये तज्ज्ञ स्टिवन गॅत्सोविझ आणि प्लॅनिंग तज्ज्ञ चार्ल्स रोझ यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार असून यावेळी महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

याबाबत महाराष्ट्र शासन अतिशय गांभीर्याने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संबंधित स्थानिक संस्थेने उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निराकरण करून हे स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय पातळीवरील संपूर्ण कार्यवाही प्राधान्याने पार पाडली जात असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

First Published on August 23, 2019 3:35 pm

Web Title: gov of maharashtra says about dr ambedkars monument in london aau 85