21 January 2021

News Flash

गोवंडी-मानखुर्द, जुईनगर-तुर्भे पूल अधांतरी

मनुष्यबळाअभावी कामे बंद

गोवंडी ते मानखुर्द रेल्वे स्थानक आणि जुईनगर ते तुर्भे रोड स्थानकादरम्यान असलेल्या दोन उड्डाणपुलांची रुंदी वाढवण्याचे काम रखडले आहे. काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत डिसेंबर २०२० पर्यंत होती, परंतु करोनामुळे प्रकल्प कामाला फटका बसला असून मनुष्यबळाअभावी काम बंद झाले. हे काम पूर्ण करण्यास आणखी काही महिने अवधी लागणार आहे.

मुंबईतील काही उड्डाणपुलांची दुरुस्ती व नवीन उड्डाणपूल उभारणीचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत करण्यात येत आहे. यात शीव-पनवेल मार्गावरील गोवंडी ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यानच्या चार पदरी उड्डाणपुलाचाही समावेश आहे. या पुलाची रुंदी वाढवून तो आठ पदरी करण्यात येणार आहे. यासाठी ३० कोटी ४४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होईल. रेल्वे मार्गावरील जुन्या पुलाच्या शेजारी नवीन खांब उभारून त्यावर गर्डरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या जुन्या उड्डाणपुलाची रुंदी दोन्ही बाजूंनी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले असून जुन्या पुलाच्या शेजारीच ४११ मीटरचा नवा भाग चेंबूरपासून वाशीपर्यंत, तसेच दुसरा ३८१ मीटरचा भाग वाशी ते चेंबूर असा उलट दिशेने बांधण्यात येणार आहे.

याशिवाय जुईनगर ते तुर्भे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाचीही रुंदी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले असून तो आठ पदरी करण्यात येत आहे. या पुलाच्या रुंदीकरणासाठी ६३ कोटी ८४ लाख रुपये खर्च येणार आहे. पहिला  ६८४ मीटरचा भाग पनवेलच्या दिशेने चढत्या क्रमाने बांधताना त्याला वाशीच्या दिशेने उतार देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या पुलाचा भाग ६०७ मीटरचा असणार असून तो वाशीपासून चढत्या क्रमाने असणार असून पनवेलच्या दिशेने त्याचा उतार असणार आहे. परंतु दोन्ही पुलांच्या कामाला गती मिळालेली नाही. मार्चपासून करोनामुळे टाळेबंदी लागू झाली आणि कामगार आपापल्या राज्यात निघून गेले. त्यामुळे या पुलाच्या कामालाही फटका बसला. डिसेंबपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र आता त्यासाठी आणखी काही महिने अवधी लागणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही तर, कॉपरेरेशनच्या जनसंपर्क विभागाशीही संपर्क साधला असता प्रकल्पाचे काम अद्याप सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 12:03 am

Web Title: govandi mankhurd juinagar turbhe bridge works closed abn 97
Next Stories
1 पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम
2 राणीबागेतील पक्ष्यांची विशेष काळजी
3 करोनामुक्त आरोग्य कर्मचाऱ्यांचेही लसीकरण गरजेचे
Just Now!
X