मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारी अंकुश लागणार आहे. कार्यकर्त्यांची मुजोरी, व्हीव्हीआयपींची अरेरावी आणि त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची होणार परवड रोखली जाण्याची शक्यता आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत एकंदर परिस्थितीची पाहणी केली आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

या निर्णयामुळे लालबागच्या राजावर आता सरकारची नजर असणार आहे. पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती दर्शन रांगेबाबात धोरण ठरवणार आहे. तसंच लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात येणाऱ्या पैसे, दागिने आणि मौल्यवान गोष्टींची मोजदाद धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. भाविकांच्या रांगा कशा असाव्यात, कोणाला अग्रक्रम मिळावा किंवा मिळू नये आदी सर्व बाबींवरती धर्मादाय आयुक्तांच्या समितीची नजर राहणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या मुजोर वागणुकीला चाप बसेल अशी अपेक्षा आहे.

लालबागच्या राजासमोर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

गणेशोत्सवादरम्यान १८ सप्टेंबरला लालबागच्या राजासमोर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. झोन ३ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी मुजोरी करत राजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी आधी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांनतर पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले होते.

यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. घडलेल्या प्रकारची दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे लालबागचा राजा मंडळाच्या मंडपात दाखल झाले होते. त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली होती. तेव्हापासूनच लालबागचा राजा मंडळावर सरकारचे नियंत्रण येणार का ? असा सवाल विचारला जात होता.